पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला आहे. ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची मावळमधील उमेदवारी निश्चित झाली. महायुतीत मतदारसंघ शिवसेनेला सुटला असल्याने मावळमध्ये दोन्ही शिवसेनेत आणि पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पवार कुटुंबीयांशी निष्ठावंत अशी ओळख असलेले संजोग वाघेरे यांनी शनिवारी शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वाघेरे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्येही तयारी केली पण, त्यांना संधी मिळाली नाही. २०१४ मध्ये राहुल नार्वेकर आणि २०१९ मध्ये पार्थ पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाला मावळमधून सक्षम उमेदवार पाहिजे होता, हीच संधी साधत वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उमेदवारीच्या अटीवरच वाघेरे यांचा प्रवेश झाला. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही. त्यामुळे एकट्याचे नाव जाहीर करणार नाही पण उत्साह बघून तुम्ही समजू शकता असे सांगत ठाकरे यांनी वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा >>>नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात गर्दीची शक्यता; वाहतुकीत असा होणार बदल
वाघेरे यांचे शरद पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे पवार गटाचे कार्यकर्ते वाघेरे यांचे काम पूर्ण ताकदीने करतील. महायुतीत मतदारसंघ शिवसेनेला सुटला असून खासदार बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास मावळमध्ये दोन्ही शिवसेनेत आणि पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
‘मावळमध्ये प्रचाराला जाणार’
उद्धव ठाकरे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून शिवसेना जिंकत आली आहे. अगदी सुरुवातीला गजानन बाबर होते. नंतर मी शब्द दिला म्हणून आता गद्दार झाले. त्यांना उमेदवारी दिली. आपल्याकडे उमेदवार नव्हता असे काही नव्हते पण त्यांनी गद्दारी केली. सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीने अनेकजण इकडे येत आहेत. मावळमध्ये प्रचाराला नक्की येणार आहे. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश आहे. रायगडमधील पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. त्यांनी द्याल तो उमेदवार असे सांगितले आहे. त्यामुळे आता पिंपरी, चिंचवड, मावळमधून चांगले मताधिक्य मिळाले पाहिजे. मावळ म्हणजे पुण्याचा भाग येतो, पुणे म्हटले की शिवनेरी आलीच. त्यामुळे जिथे शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच गद्दारी गाडण्याची सुरुवात करायची आहे.