पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपात या मतदारसंघावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने हा मतदारसंघ खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, शिवसेनेने (ठाकरे) हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघावरील दावा सोडावा, यासाठी तडजोड म्हणून पर्वती मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे) देण्याचा डाव राष्ट्रवादीने (शरद पवार) टाकला आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर आणि पर्वती मतदारसंघावर आग्रही दावा केला आहे. पर्वती येथून स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम आणि त्यांचे पती नितीन कदम इच्छुक आहेत. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसने घ्यावा, यासाठी काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याबाबतचे निवेदनही त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिले होते. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी बागुल इच्छुक असून, त्यांनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणीही केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच पर्वती मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यातच काँग्रेसने या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पर्वतीवरील दावाही कायम ठेवला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास शिवसेना (ठाकरे) इच्छुक नाही. शिवसेनेच्या (ठाकरे) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोथरूड, हडपसर आणि वडगाव शेरीसह खडकवासाला मतदारसंघाची मागणी केली आहे. तसा प्रस्तावही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आला आहे. यापैकी कोथरूड आणि हडपसर या दोन मतदारसंघांत शिवसेनेची (ठाकरे) ताकद असून, तेथे पक्षाचे माजी आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोथरूडची जागा शिवसेनेकडेच (ठाकरे) राहील, अशी चर्चा आहे. मात्र, हडपसर मतदारसंघही शिवसेनेला (ठाकरे) हवा असल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांनी हडपसर मतदारसंघावरील दावा सोडण्यासाठी वेळ पडल्यास तडजोड म्हणून पर्वती मतदारसंघ देण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडे (ठाकरे) या मतदारसंघात माजी नगरसेवक बाळा ओसवाल प्रबळ दावेदार आहेत. मात्र, पर्वती शिवसेनेला (ठाकरे) सोडण्यास काँग्रेसकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi split from parvati assembly constituency pune print news apk 13 amy