पुणे : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला जनमताचा कौल होता. मात्र त्याचा अवमान करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीच्या सरकारने महायुतीच्या कल्याणकारी योजनांना स्थगिती दिली. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला, असा आरोप केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी येथे केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेखावत यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. पुण्यातील ऐतिहासिक वारसा देशातील पर्यटन केंद्राशी जोडला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दावा

‘सन २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असतानाही राजकीय घडामोडींनी विकास थांबला. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी युतीच्या योजना, कामांना स्थगिती देण्यास सुरुवात केली. महाविकास आघाडीने लोकशाही विरोधी कामे केली. करोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून राहिले. महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकारने लाडकी बहीण योजना राबविली. मात्र त्याला विरोध करत त्यांनी न्यायालयात दाद मागितली आणि योजनेची लोकप्रियता पाहून महाविकास आघाडीने योजनेचा समावेश जाहीरनाम्यात केला, ही बाब हस्यास्पद आहे,’ अशी टीका शेखावत यांनी केली.

हेही वाचा – देशात बारामतीची ओळख कोणामुळे? शरद पवार यांनी अजित पवारांना सुनावले

पुण्यातील शिवसृष्टीला केंद्राने ८० कोटींची मदत केली आहे. पुण्यातील ऐतिहासिक वारसा देशातील पर्यटन केंद्राशी जोडण्यात येईल. राज्यातील दहा किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित व्हावेत, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती शेखावत यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi suspension of welfare schemes has stunted maharashtra development says gajendra singh shekhawat pune print news apk 13 ssb