पुणे : जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकासआघाडीला १७ जागांवर विजय मिळाला, तर भाजपा-शिंदे गटाला एक जागेवर समाधान मानावे लागले.
आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. अगोदरपासूनच महाविकास आघाडीची विजयी घोडदौड सुरू होती. अजित पवार यांनी मावळमध्ये केलेल्या विकास कामामुळेच हा विजय मिळाला असल्याचे सांगत विजयाचे श्रेय अजित पवार यांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले.
हेही वाचा – पुणे: वारजे भागांतील भाजप पदाधिकऱ्याची आत्महत्या
मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शुक्रवारी मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सकाळी नऊ ते चार या वेळेत मतदान झाले. मतदारांनी ९८ टक्के मतदान केले. कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व असणार याकडे अवघ्या मावळ वासियांचे लक्ष होते. आज अखेर दुपारपर्यंत निकाल हाती आले असून महाविकास आघाडीने मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा – पुणे विभागात ४५०० दुकानात इंटरनेट सेवा
राष्ट्रवादी १५, काँग्रेस २ (महाविकास आघाडी) आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांना १ जागेवर विजय मिळाला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा धोबीपछाड केला होता. आता पुन्हा एकदा शेळके हे भेगडेंना वरचढ ठरले आहेत.