ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तुटलेल्या अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापारेषण कंपनीच्या वतीने मागील तीन दिवसांपासून सुरू आहे.. या दुरुस्तीवर आतापर्यंतच तब्बल चाळीस लाख रुपयांचा खर्च झाला आहे.. वीजवाहिनी तुटल्याने शहराच्या मध्यवस्तीतील लोकांना वीजकपातीचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.. वीज असूनही ती देता येत नसल्याने दुसरीकडे ‘महावितरण’चेही नुकसान होत आहे.. हा इतका सारा गोंधळ उडाला असताना ‘जाऊ द्या, मिटवून घ्या’, असे सांगत ठेकेदाराविरुद्ध कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे.
सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ महापालिकेच्यावतीने खोदकाम करण्यात येत होते. जेसीबीच्या साहाय्याने होत असलेल्या या खोदकामामध्ये रास्ता पेठ वीजउपकेंद्राला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी तुटली. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भाग व पूर्व भागातील पेठांमधील वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी वीजवाहिनीची दुरुस्ती गरजेची असल्याने त्याच दिवशी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दिवसाच नव्हे, तर रात्रीही काम सुरू ठेवण्यात आले. वीजपुरवठा खंडित झालेल्या भागामध्ये इतर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, काही भागामध्ये नाईलाजास्तव वीजकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अत्यंत किचकट असल्याने सोमवारी सुरू झालेले काम आणखी एक ते दोन दिवस चालणार आहे. महापारेषण कंपनीची सर्व यंत्रणा हे काम पूर्ण करण्यात जुंपली आहे. ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा काही हजारात नव्हे, तर लाखांच्या घरात जात आहे. आतापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीसाठी चाळीस लाखांचा खर्च झाला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ही रक्कम पन्नास लाखांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे काही नागरिकांना अजूनही वीजकपातीला सामोरे जावे लागत आहे. वीज उपलब्ध असूनही ती पुरविता येत नसल्याने ‘महाविरतरण’ला मिळणाऱ्या विजेच्या बिलांमधूनही नुकसानच होणार आहे.
नागरिकांचा मनस्ताप होण्याबरोबरच नुकसानीचा डोंगर वाढत असताना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या काही मंडळींकडून ठेकेदाराची बाजू घेण्याचे काम करण्यात येत आहे. ‘जाऊ द्या, मिटवून घ्या. ठेकेदाराला कशाला गोत्यात आणता’ असे सांगून ठेकेदाराविरुद्ध कारवाई न करण्याबाबत अप्रत्यक्षपणे दबाव आणला जात आहे. मात्र, महापारेषण कंपनीला वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च हा ग्राहकांचाच आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच त्याच्याकडून नुकसान भरपाईही घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
‘महापारेषण’ची ‘महापरेशानी’!
महापारेषण कंपनीच्या वतीने टाकण्यात येणाऱ्या उच्चदाबाच्या व अतिमहत्त्वाच्या भूमिगत वीजवाहिन्यांचा नकाशा महापालिकेला दिलेला असतो. महापालिकेकडून संबंधित रस्त्यावर खोदकाम करायचे असल्यास संबंधित ठेकेदाराला त्याबाबकत सूचनाही दिल्या जातात. महत्त्वाच्या वाहिन्या असलेल्या रस्त्यांवर ‘महापारेषण’चे कर्मचारी सातत्याने खोदकामावर लक्ष ठेवून असतात. मात्र, अनेक ठेकेदार रस्त्यावर खोदकाम करीत असताना कोणताही नकाशा पाहत नाहीत किंवा खोदकामाबाबत नियमांचे पालन करीत नाहीत. एखाद्या वेळी मूळ ठेकेदार वेगळाच असतो व खोदकाम वेगळीच व्यक्ती करते. अशा सर्व प्रकारांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या तुटतात व त्याचा भरुदड महापारेषण कंपनीबरोबरच नागरिकांनाही बसतो. सातत्याने होत असलेले हे प्रकार ‘महापारेषण’साठी ‘महापरेशानी’ ठरत आहेत.

Story img Loader