बारामती: महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित क्रिकेटच्या प्रदर्शनीय सामन्यात कर्णधार संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे व कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी ३७ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबई मुख्यालय संघाने पुणे प्रादेशिक संघावर शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत एक गडी राखून मात केली. पुणे प्रादेशिक संचालक व कर्णधार श्री. भुजंग खंदारे यांनी गोलंदाजीमध्ये अचूक मारा करीत तीन बळी मिळवत सामन्यात रंगत आणली. मात्र मुंबई मुख्यालयाच्या उर्वरित फलंदाजांनी सावध पवित्रा घेत संघाला विजय मिळवून दिला.
बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर शनिवारी (दि. ८) झालेल्या १६ षटकांच्या क्रिकेट सामन्यात पुणे प्रादेशिक संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. यात कार्यकारी अभियंता श्री. संजय गायकवाड (२३ धावा) व सहायक महाव्यवस्थापक श्री. शशिकांत पाटील (१३ धावा) यांनी जोरदार सुरवात केली. त्यानंतर मुख्य अभियंता श्री. स्वप्निल काटकर व श्री. धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता श्री. विकास आल्हाट यांनीही धावसंख्येला आकार दिला. त्यामुळे पुणे प्रादेशिक संघाने १६ षटकांत ५ बाद ७८ धावा केल्या. यात मुख्यालय संघातील कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, दिनेश अग्रवाल, दत्तात्रेय पडळकर, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, कार्यकारी अभियंता सुनील पावरा यांनी अचूक गोलंदाजी करीत पुणे प्रादेशिक संघाला रोखण्यात यशस्वी झाले.
७९ धावांचे आव्हान स्विकारून मुंबई मुख्यालय संघाने फलंदाजी सुरु केली. मात्र शशिकांत पाटील यांच्या पहिल्याच षटकात एक फलंदाज शून्य धावसंख्येवर गमावला. कार्यकारी संचालक श्री. दिनेश अग्रवाल व सहायक महाव्यवस्थापक श्री. वैभव थोरात यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही सावधपणे धावसंख्या वाढवत असताना बाद झाले. त्यानंतर संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे (२१ धावा) व कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर (१९ धावा) यांनी डाव सावरला आणि चौफेर फटकेबाजी करीत ३७ धावांची भागीदारी केली.
ही भागीदारी वाढत असताना पुणे प्रादेशिक संघाचे कर्णधार भुजंग खंदारे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अचूक मारा सुरु केला. त्यांनी दोन षटकांत तीन फलंदाजांना बाद करीत सामन्याची रंगत वाढवली. मात्र गौरव खरे व हसीब खान यांनी सावध फलंदाजी करीत एकेरी, दुहेरी धावा केल्या. त्यामुळे मुख्यालय संघाची धावसंख्या ८ बाद ७२ झाली आणि शेवटच्या षटकात विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. शेवटचे षटक श्री. खंदारे यांनी सुरु केले. यात दुसऱ्याच चेंडूवर मुख्यालय संघाचा फलंदाज धावचित झाला आणि सामन्याच्या निकालाची आणखीनच उत्कंठा वाढली. मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना सुमेध कोलते यांनी संघाला विजय मिळवून दिला.