पुण्यातील महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्तरावर निवडणूक तयारी सुरू करण्यात आली असून महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी बोलावण्यात आला होता. अशाच प्रकारे ११ आणि १२ मार्च रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय महायुतीचे मेळावे आयोजित करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
लोकसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच महायुतीचे पदाधिकारी एकत्र आले. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, शिवसेनेचे पुणे शहर संपर्क नेते गजानन कीर्तिकर, शहरप्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, आरपीआयचे महेंद्र कांबळे, नवनाथ कांबळे, तसेच आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती. आगामी कार्यक्रमांची रूपरेषा या वेळी निश्चित करण्यात आली. बूथ रचना उभी करून मतदारांपर्यंत कशाप्रकारे पोहोचले पाहिजे, याची माहिती या वेळी मिसाळ यांनी दिली. महायुतीला अनुकूल वातावरण आहे म्हणून गाफील राहू नका. प्रत्येक बूथपर्यंत आपले कार्यकर्ते पोहोचतील यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागेल. पुढील काही दिवसांत त्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आमदार गिरीश बापट यांनी या वेळी केले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पुण्यातून महायुतीचाच खासदार दिल्लीत पोहोचेल, असे कीर्तिकर म्हणाले. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना भाजपने खासदार करून सत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यामुळे दलित समाजही आता भाजप, शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहील, असे कांबळे यांनी या वेळी सांगितले.
महायुतीतर्फे फक्त पदाधिकाऱ्यांनाच एकत्र न करता महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला. त्यानुसार मंगळवार, बुधवार (११ व १२ मार्च) असे दोन दिवस हे मेळावे होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा