पिंपरी : राज्यात महायुतीत एकत्र सत्तेत असलेले आणि महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष केंद्रित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर, आज (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात सत्तेतील या दोन्ही पक्षांत महापालिका ताब्यात घेण्यावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरावर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर आता सर्वपक्षीयांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. तर, भाजपही स्वबळावर लढणार असून, मागील वेळेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केला आहे. एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहराची अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. परंतु, त्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने २०१७ मध्ये सुरुंग लावला. १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकली. राजकीय वातावरण बदलल्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी पवारांची साथ सोडत कमळ हाती घेतले. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलविले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातले.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्याने शहरातील पदाधिकाऱ्यांना राजकीय ताकद दिली. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी दिली. उमा खापरे, अमित गोरखे यांना विधान परिषदेवर घेत आमदार केले. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे यांना महामंडळ देत राज्यमंत्रिपदाचा दर्जाही दिला होता. शहरातीलच अनुप मोरे यांच्याकडे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. शहरावर भाजपने लक्ष केंद्रित केले असून, सर्वांत ताकदवान पक्ष झाला. चार आमदार असल्याने शहर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाऊ लागले.

आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकत्वही त्यांच्याकडे आहे. पवार यांनी पुन्हा शहरातील राजकारणात लक्ष घातले आहे. नुकतेच त्यांनी महापालिकेच्या अपंगांच्या पर्पल महोत्सवाला उपस्थिती लावली होती. बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी बेरजचे राजकारण सुरू केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत स्वगृही येण्याची साद घातली. त्यामुळे हे पदाधिकारी लवकरच स्वगृही परतणार असल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी शहर भाजपनेही तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे गुरुवारी शहरात येणार आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच शहरात येणार आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन यासह महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

भाजप महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मागीलवेळी ७७ नगरसेवक होते. यावेळी अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा फायद्याचा ठरणार आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

Story img Loader