भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जोरदार  रस्सीखेच सुरू, नेत्यांच्या भेटीगाठींवर भर

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या असून, या जागांवर पुण्यातील कोणाला संधी दिली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्यांना महायुतीत मित्र पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांच्या नेत्यांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता. त्यानुसार आता कोणाला संधी मिळणार हे लवकरच निश्चित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील २८८ जागांपैकी २३५ जागा महायुतीने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत विधान परिषदेवर असलेल्या महायुतीच्या सहा आमदारांचाही विजय झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये चार जागा भाजप, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या रिक्त झालेल्या जागांवर नाराजांना संधी दिली जाणार आहे.

हेही वाचा >>> उमलत्या वयात हिंसेचा मार्ग का?

या जागांवर वर्णी लागावी यासाठी तिन्ही पक्षांतील इच्छुकांकडून लॉबिंग केले जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या या रिक्त जागांवर संधी मिळावी, यासाठी पुणे शहरातील अनेक इच्छुक आहेत. महायुतीकडून ऑक्टोबर महिन्यात १२ पैकी ७ जणांची राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पुणे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, मानकर यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्या वेळी पक्षाचे नेते अजित पवार यांनी मानकर यांची भेट घेऊन तुमची दखल घेतली जाईल, असे सांगितले होते. लोकसभेच्या निवडणुकीत मानकर यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, तसेच कसबा विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात भाग घेऊन त्यांना मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे मानकर यांचे नाव आघाडीवर आहे.

हेही वाचा >>> कोथरुडमध्ये मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

माजी राज्यसभा खासदार संजय काकडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हेदेखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. भिमाले पर्वतीतून, तर घाटे कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. भाजपने त्यांना तिकीट न दिल्याने ते नाराज होते. त्या वेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती. वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे तर उमेदवारी अर्ज भरण्याासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहचले होते. पण, अर्ज भरण्यासाठी दहा मिनिटे शिल्लक असताना फडणवीस यांनी फोन करून त्यांना उमेदवारी अर्ज न भरण्यास सांगितले. त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला होता. वडगाव शेरीचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारसभेत वडगाव शेरीत दोन आमदार असतील, असा शब्द फडणवीस यांनी मुळीक यांना दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यामुळे मुळीक यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सहा जागापैकी पुण्यातील नक्की कोणाला संधी मिळणार हे पुढील काही महिन्यामध्येच स्पष्ट होणार आहे.

सहा जागांचे गणित असे आहे… विधान परिषद सदस्य असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रमेश कराड, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके या चार जणांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. हे चारही जण विजयी झाले असल्याने भाजपच्या कोट्यातील चार जागा रिक्त झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विधान परिषद सदस्य राजेश विटेकर तसेच शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमशा पाडवी हे विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिक्त झाली आहे.