लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होणार असून राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्लाही उद्ध्वस्त होईल, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील सभेत केला.
 शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. खोत म्हणाले की, माढा मतदार संघातून शेतकऱ्यांचा विजय निश्चित आहे. राज्यात गारपीट झाली त्यानंतर काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नाही. महायुती लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मोठे यश मिळवेल.
शिवाजीराव आढळराव या वेळी म्हणाले की, शिरूर मतदारसंघात  कोट्यवधींची विकास कामे केली आहेत. देशामध्ये नरेंद्र मोदींची लाट असून ती कोणी रोखू शकत नाही.
माजी आमदार बाबुराव पाचर्णे या वेळी म्हणाले की राज्यात युतीचे ३५ खासदार निवडून येतील. माढा मतदारसंघात उभे असणारे महायुतीचे सदाभाऊ खोत यांना शिरुर तालुक्यातून ५ लाख रुपयाचा निधी जमा करून देण्यात येईल.
या सभेला शिवसेनेचे नेते मनोहर गायखे, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, कल्पना आढळराव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बबन पोकळे, पाराभाऊ गावडे, राम गावडे, सावित्रा थोरात, गुलाबराव धुमाळ आदींची या वेळी भाषणे झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti will defeat ncp clearly in shirur sadabhau khot