पिंपरीतील राखीव मतदारसंघावरून भाजप-शिवसेना व रिपाई महायुतीत तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे असताना भाजपकडील उमेदवारीचे प्रबळ दावेदार अमर साबळे यांनी मात्र दोन पाऊले मागे येण्याची भूमिका घेतली असून आपण उमेदवार असू किंवा नसू, पिंपरीत महायुतीच विजयी होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपमध्ये कसल्याही प्रकारची गटबाजी नाही, असा दावाही त्यांनी केला.
पिंपरी मतदारसंघ भाजपकडे असून साबळे यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून थोडक्यात पराभूत झालेल्या साबळे यांच्याकडे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. मात्र, शिवसेना व रिपाइं यांनाही हा मतदारसंघ हवा आहे. त्यादृष्टीने त्यांची जोरदार तयारी आहे. तीनही पक्ष पिंपरीसाठी आग्रही असल्याने ही जागा कोणाला मिळणार व इतर दोन पक्ष काय भूमिका घेणार, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या सर्व मुद्दय़ांवर बोलताना साबळे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल, तो आपल्याला मान्य असेल. ही जागा महायुतीचजिंकणार आहे. उमेदवार कोण हा विषय तितका महत्त्वाचा नाही. पिंपरी भाजपमध्ये कसल्याही प्रकारे गटबाजी नाही, फक्त भाजप हाच गट आहे.मतमतांतरं असू शकता, याचा अर्थ गटबाजी असा होत नाही. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव सर्वत्र आहे, त्याचा भाजपला तसेच मित्रपक्षांना निश्चितपणे फायदा होणार आहे. भाजप हा जातीयवादी पक्ष असल्याची टीका सत्ताधारी करतात. प्रत्यक्षात तेच जातीयवाद करतात, हे वेळोवेळी सिध्दही झाले आहे. मागासवर्गीय समाजाचे सर्वाधिक आमदार व खासदार भाजपचे आहेत. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांना बाजूला करून रिपाइं नेते रामदास आठवले यांना भाजपच्या कोटय़ातून खासदारकी देण्यात आली, ही उदाहरणे पुरेशी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा