लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पावसामुळे रद्द झाल्यामुळे भाजपचे शक्तिप्रदर्शन ‘पाण्यात’ गेल्यानंतर आज, रविवारी (२९ सप्टेंबर) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्पांचे सकाळी साडेअकरा वाजता उद्घाटन होणार आहे. त्यासाठी महायुतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जाहीर सभेचे आयोजन करून पुन्हा जोमाने शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे गेल्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारे उद्घाटन रद्द झाल्याने भाजपचे मनसुबे पाण्यात गेले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा घेतली जाणार आहे. या ठिकाणी पाच ते सहा हजार नागरिक उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक भागातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, किती नागरिकांना या कार्यक्रमासाठी आणायचे, याची आखणी केली आहे.

आणखी वाचा-संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गाचे लोकार्पण, तसेच स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (२६ सप्टेंबरला) केले जाणार होते. या प्रकल्पासह अन्य काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार होते. यानिमित्त मोदी यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभादेखील घेतली जाणार होती. यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनाच्या आदल्या दिवशी शहरात मुसळधार पाऊस पडला. ज्या दिवशी पंतप्रधान पुणे दौऱ्यावर येणार होते, त्या दिवशी देखील हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मोदी यांचा दौरा अचानक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठीचा दौरा पंतप्रधान कार्यालयाने रद्द केल्याने शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि नेते नाराज झाले होते. विरोधकांनी मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने शुक्रवारी २७ सप्टेंबरला जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनमध्ये जाऊन आंदोलन करत मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होणे महत्त्वाचे असल्याने भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर रविवारी हे उद्घाटन करण्याचे निश्चित झाले.

आणखी वाचा-चिंचवड विधानसभा : जगताप कुटुंबीयांची कोंडी; भाजपमधून ‘या’ दोन माजी नगरसेवकांचा विरोध, २० ते २५ नगरसेवक…

पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. गणेश कला क्रीडा येथे सकाळी ११ वाजता हे सर्व नेते हजर राहणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

गणेश कला क्रीडा येथे आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. या सभागृहाची आसनक्षमता साडेतीन ते चार हजार आहे. मात्र, या कार्यक्रमासाठी गर्दी होणार असल्य़ाचे लक्षात घेऊन बाहेरच्या बाजूला आवश्यक ती व्यवस्था उभारण्यात आली आहे. एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्येक भागातील पक्षाच्या प्रमुखाकडे जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे पुणे शहर प्रचार प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली.

आणखी वाचा-मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल, शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गिकेचे उद्या उद्घाटन

‘मन की बात’नंतर उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याच्या अखेरच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधत असतात. २९ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी हे हा कार्यक्रम संपल्यानंतर पुणे मेट्रो मार्गाचे उद्घाटन करतील. त्यापूर्वी गणेश कला क्रीडा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मनोगत व्यक्त करणार आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मेट्रोने प्रवास करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हिरवा झेंडा दाखवून मेट्रो मार्गाचे लोकार्पण, तसेच प्रस्तावित मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाच्या मेट्रोने प्रवास करतील. या वेळी महायुतीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी सहभागी होतील, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असा प्रवास मेट्रोने करणार होते, असे घाटे म्हणाले.