आधुनिक भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी विविध प्रसंगी दिलेली सात व्याख्याने लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहेत. ‘सप्तक’ हे या पुस्तकाचे नाव असून प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ चितारले आहे.
एलकुंचवार यांनी नाटकाव्यतिरिक्त विविध विषयांवर मांडलेले विचार ‘सप्तक’च्या माध्यमातून वाचकांना एकत्रितपणे अनुभवता येणार आहेत. ‘मौनराग’ या ललित लेखसंग्रहानंतर त्यांचे हे पुस्तक त्यांच्यातील वक्तृत्व गुणांची प्रचिती देणारे ठरेल. एलकुंचवार यांना मिळालेल्या पुरस्कारप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेले मुक्त चिंतन हे राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये शब्दबद्ध करण्यात आले आहे. मराठी नाटक, भारतीय रंगभूमी, ललित साहित्य, कुसुमाग्रज, जी. ए. कुलकर्णी, ग्रेस अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील त्यांची व्याख्याने संपादित करून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. एका प्रतिभावान नाटककाराचे हे विचार महत्त्वाचे असल्याने या व्याख्यानांचे पुस्तक वाचकांपुढे ठेवताना आनंद होत आहे, असे राजहंस प्रकाशनचे संचालक-संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी दिली.
मी काही वक्ता नाही आणि वक्ता म्हणून प्रसिद्धदेखील नाही याचे भान मला आहे. पण, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांच्या औचित्याने मी काही विचार व्यक्त केले होते. त्याचे पुस्तक होऊ शकते असे काही डोक्यामध्ये नव्हते. अशा पद्धतीचे पुस्तक व्हावे ही संकल्पना राजहंस प्रकाशननेच साकारली आहे. या व्याख्यानांच्या सीडी उपलब्ध झाल्यानंतर त्यावरून हे पुस्तक करण्यात आले आहे. या पुस्तकाबाबत वाचकांच्या काय प्रतिक्रिया येतात याची आता उत्सुकता आहे, असे नाटककार महेश एलकुंचवार यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2014 रोजी प्रकाशित
एलकुंचवारांचे व्याख्यान ‘सप्तक’ पुस्तकरुपात
आधुनिक भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी विविध प्रसंगी दिलेली सात व्याख्याने लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहेत.
First published on: 02-09-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh elkunchwar book speech