राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच चव्हाटय़ावर आली. महापौर मोहिनी लांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या विरुद्ध पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत पक्षाचा ‘उद्धार’ केला. अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या महेश लांडगे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत, हे पद फक्त अजितदादांनी मिळवून दिले असून स्थानिक नेत्यांचे योगदान शून्य आहे, असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कोणाची खासगी मालमत्ता नसून अजितदादा कोणाला बांधील नाहीत, ते खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देतात, अशी सूचक शेरेबाजीही केली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता पार पडल्यानंतरच्या समारंभात महापौर मोहिनी लांडे यांनी लांडगे यांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी त्यांनी केलेली काही विधाने लांडगे यांनी आपल्या भाषणात खोडून काढली. आपली शिफारस केली, असे म्हणण्याचा अधिकार एकाही स्थानिक नेत्याला नाही. आपल्यावर १० वर्षांपासून होत असलेला अन्याय अजितदादांनी दूर केला. खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, हे त्यांनी दाखवून दिले. स्थानिक नेत्यांनी नुसतेच खेळवण्याचे काम केले. आपल्याला पद मिळण्यापासून कोणी रोखले, ते शहराला माहीत आहे. चांगले काम केल्यास मोठी संधी देऊ, अशी ग्वाही अजितदादांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक लढणारच, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. लागोपाठ दोन आचारसंहिता येणार असल्याने आपणाला अत्यल्प कालावधी मिळणार आहे. त्यात समाविष्ट गावे तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील कामे प्राधान्याने करणार आहोत, असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘लक्ष्य २०१४’ च्या टोप्या घालून मोठय़ा संख्येने लांडगे समर्थक पालिका मुख्यालयात आले होते. भंडारा उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.