सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा-पाणी देण्याचे काम करून माहेश्वरी समाजाने पशुधन वाचविण्यासाठी हातभार लावला आहे. आर्थिकदृष्टय़ा सधन असलेल्या या समाजाने दुष्काळावर मात करण्यासाठी गावे दत्तक घ्यावीत, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली. हिरालाल मालू हे माहेश्वरी समाजाचे पुण्यातील ‘नारायण’ आहेत, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.
हिरालालजी मालू अमृतमहोत्सव सत्कार समितीतर्फे शरद पवार यांच्या हस्ते महेश सहकारी बँकेचे संस्थापक आणि महेश सांस्कृतिक भवनाचे कार्याध्यक्ष हिरालाल मालू यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. महापौर वैशाली बनकर, स्वामी गोिवददेव गिरी ऊर्फ आचार्य किशोर व्यास, शकुंतला मालू आणि समितीचे अध्यक्ष श्रीराम कासट या प्रसंगी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, प्रत्येक समाजाचे देशासाठी योगदान असते. माहेश्वरी समाजातील बिर्ला, बजाज यांनी औद्योगीकरणाचा पाया उभारण्याची कामगिरी केली. धूत, नाखूर आणि पत्रकारितेमध्ये माहेश्वरी या कुटुंबांनी योगदान दिले. समाज म्हणजे केवळ माहेश्वरी असा सुंकचित विचार न करता समाजाच्या उपयोगाचे काम माहेश्वरींनी केले. संकटग्रस्त, दु:खितांचे अश्रू पुसण्याचे काम करण्यामध्ये हिरालाल मालू सातत्याने आघाडीवर राहिले. देशाचा व्यवहार मला थोडाबहुत समजतो त्याला माहेश्वरी समाजातील मित्रांची संगत कारणीभूत आहे. मी १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत गेलो. त्यानंतर माझे लग्न झाले. आमदार निवासामध्ये पती-पत्नीने राहण्यासारखी सुविधा नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन एका मित्राने माझी मदनबाबू माहेश्वरी यांची ओळख करून दिली. माहेश्वरी यांनी त्यांच्या मोकळ्या सदनिकेच्या चाव्या माझ्या हाती दिल्या. १९७२ ला मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यावर सरकारी बंगला मिळाला. त्या वेळी फर्निचरच्या खर्चावरून टीका झाल्यामुळे संध्याकाळी मुक्काम सोडून पुन्हा माहेश्वरी मॅन्शनमध्ये राहायला आलो.
परदेशी व्यक्तीला पंतप्रधान होऊ देणार नाही हा विचार ठेवणाऱ्या शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याची ऊर्मी दाटून आली होती, असे सांगून स्वामी गोविंददेव गिरी यांनी हिरालाल मालू यांच्या कार्याची प्रशंसा केली.
हिरालाल मालू म्हणाले, माझ्या हातून जे थोडेफार कार्य झाले त्याचे श्रेय माझ्या एकटय़ाचे नाही. एकत्रित होऊन परस्परांशी संवाद साधत युवकांनी कार्य करावे आणि समाजऋणाची ज्योत अंतर्मनात तेवत ठेवावी.
विठ्ठल मणियार यांनी मानपत्राचे वाचन केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
मग रुपी बँकच होणार
देशाचा सहकारमंत्री या नात्याने नागरी बँकांच्या कुंडल्या माझ्याकडे असतात. तीन महिन्यांपूर्वी रुपी बँकेकडे पाहण्याची गरज आहे, असे माझ्या ध्यानात आले. पण, त्यांच्यापर्यंत योग्य निरोप पोहोचवून त्यासंदर्भातील दक्षता घेतली नाही. काय झाले हे आजच्या वृत्तपत्रांमध्ये आलेच आहे, असे सांगून शरद पवार म्हणाले, गृहराज्यमंत्री म्हणून १९७२ मध्ये माझ्या हस्ते महेश सहकारी बँकेचे उद्घाटन झाले होते. या बँकेकडून फारसे कोणी कर्जच घेत नाही. जे कर्ज घेतात ते व्याजासकट पैसे वेळेवर परत करतात. त्यामुळे बँकेचा शून्य टक्के ‘एनपीए’ आहे. त्याकडे लक्ष दिले नाही आणि १४ टक्के एनपीए झाल्यावर मग त्याची रुपी बँकच होणार.  

Story img Loader