लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच होणाऱ्या व राजकीय उलथापालथीमुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झालेल्या पिंपरी पालिकेतील सहा क्षेत्रीय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या वादात राष्ट्रवादी गोत्यात आल्याचे चित्र होते. तथापि, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतली व सहापैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडले गेले. सहावी जागा काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने ‘मोठे मन’ दाखवले.
क्षेत्रीय समित्यांच्या निवडणुकीत ‘अ’ – सुभद्रा ठोंबरे, ‘ब’- शेखर ओव्हाळ, ‘क’- सोनाली निकम, ‘ड’ – आरती चोंधे, ‘इ’ – सुरेखा गव्हाणे आणि ‘फ’ क्षेत्रीय समितीच्या सभापतिपदी वनिता थोरातांची निवड झाली. अ क्षेत्रीय कार्यालयासाठी जावेद शेख यांचा अर्ज होता. तथापि, अजितदादांनी ठोंबरे यांना यापूर्वीच शब्द दिला होता. त्यांच्या सूचनेनुसार जावेदने अर्ज मागे घेतला व  ठोंबरे यांची निवड झाली. ‘ब’ च्या अध्यक्षपदासाठी ओव्हाळ व भाजपचे शीतल िशदे यांच्यात लढत झाली. त्यात ओव्हाळांना १० तर िशदेंना ५ मते मिळाली. छाया साबळे यांच्या उमेदवारीसाठी माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे यांनी बराच थयथयाट केला. ‘क’ च्या निवडणुकीतून अमिना पानसरे, शकुंतला बनसोडे यांनी माघार घेतल्याने जम यांची बिनविरोध निवड झाली. ‘ड’ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शकुंतला धराडे यांनी अर्ज मागे घेतला. भाऊसाहेब भोईर यांनी अजितदादांकडे हट्ट धरल्याने ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली. त्यानंतर आरती चोंधे यांची वर्णी लागली. ‘इ’  साठी एकमेव अर्ज असलेल्या सुरेखा गव्हाणे बिनविरोध सभापती झाल्या. ‘फ’ मध्ये मनसेचे राहुल जाधव यांनी माघार घेतल्याने वनिता थोरात यांची निवड झाली.
मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून शेकापशी घरोबा केला. नेत्यांनी सातत्याने दमबाजी करूनही राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरसेवकांनी उघडपणे जगतापांचा प्रचार केला. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे वाद पराकोटीला गेले होते, त्याचे पडसाद निवडणुकांवर होते. तथापि, काहीतरी वेगळे होण्याची चिन्हे दिसल्याने अजितदादांनी सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेतली. जगताप समर्थक जावेद शेख यांना थांबवून ठोंबरेंना संधी दिली. दुसरीकडे, जगताप समर्थक ओव्हाळ व जम यांची वर्णी लावली. ‘सहयोगी’ काँग्रेसला एक अध्यक्षपद दिल्यानंतर जगताप व भोइरांचे निकटवर्तीय चोंधे यांना संधी मिळाली. आमदार विलास लांडे समर्थक सुरेखा गव्हाणे तसेच पक्षनेते मंगला कदम समर्थक वनिता थोरातांना संधी देऊन भोसरीच्या पट्टय़ात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. अजितदादांच्या आदेशानुसार उमेदवारी देण्यात आल्याचे मंगला कदम यांनी स्पष्ट केले.
 
नगरसेवकाला विवाहाची अशीही भेट
राष्ट्रवादीचे पुनावळ्याचे नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा मंगळवारी विवाह आहे. त्यांना अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने त्यांना वेगळीच भेट दिली. मात्र, निवडणुकांचे सावट त्यावर होते. अन्य पाच समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असताना ओव्हाळ यांना महायुतीचे शीतल िशदे यांच्याशी लढत द्यावी लागली. मात्र, अपेक्षेप्रमाणे ते निवडूनही आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा