गणेशोत्सवास सुरुवात होऊन सात दिवस उलटले असून आता मंडळे विसर्जनाच्या तयारीला लागली आहेत. गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित विविध कार्यक्रम तसेच महोत्सवांमुळे उत्सवाची रंगत चांगलीच वाढली आहे.
भोसरीतील कुस्ती, कबड्डी व बैलगाडा शर्यत प्रेमाची ख्याती सर्वश्रुत आहे. गेल्या काही वर्षांत भोसरीत सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल आढळून येते. भोसरी कला क्रीडा मंचाचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यापैकी एक आहे. यंदाच्या भोसरी महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते झाले. भोसरीकरांची रसिकता पाहून ते भारावून गेले. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, संस्थेचे संस्थापक विजय फुगे, अध्यक्ष नगरसेवक नितीन लांडगे, महेश लांडगे आदींसह तुडुंब गर्दी होती. प्रथमच भोसरीत आलेल्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे प्रेम अंतरंगाला भिडणारे असते, अशी भावना व्यक्त केली. भोसरीत एवढे चांगले नाटय़गृह आहे, याची आपल्याला कल्पना नव्हती. येथील क्रीडाप्रेम आपण ऐकून होतो. मात्र, सांस्कृतिक प्रतिसादही आज अनुभवला. हे प्रेम आपण विसरणार नाही, ते कायम अंतकरणात राहील, असे ते म्हणाले. रांगोळी स्पर्धा, हसरी उठाठेव, कवी संमेलन, ऑक्रेस्ट्रॉ, विविध कलागुणदर्शन आदी कार्यक्रमांचा महोत्सवात समावेश होता. खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी पोलीस हवालदार शरद काळे व अभिनेते केतन लुंकड यांचा गौरव करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड सोशल क्लबने तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले. प्राधिकरणात राहणाऱ्या व ‘ग्रँड मस्ती’ च्या प्रमोशनसाठी आलेल्या सोनालीचे ‘अप्सरा आली’ गाण्यावरचे नृत्य उद्घाटनाचे आकर्षण ठरले. महापौर लांडे, संयोजक श्रीरंग बारणे, प्रवीण तुपे, उमा खापरे, राजू गोलांडे आदी उपस्थित होते. महोत्सवात प्रश्नमंजूषा, शरीरसौष्ठव स्पर्धा, डॉग शो, ‘ट्रान्स’ क्लासिकल फ्युजन, सूर आनंदघनी, पाक कला स्पर्धा, महिलांकरिता रांगोळी, युवकांसाठी प्रश्नमंजूषा, ‘धन्य तुकोबा समर्थ’, परंपरा महोत्सव, मराठी नाटक ‘नाथ हा माझा’, सुगम संगीत स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम होते.

Story img Loader