लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चहा आणि कॉफीमधून गुंगीचे औषध पाजून घर मालकाला बेशुद्ध करत मोलकरणीने तिच्या साथीदारांसोबत मिळून १६ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना निगडी प्राधिकरण येथे घडली.

देवेंद्र गुमानमल लुंकड (वय ६७, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनामिका (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि तिचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- बेशिस्त वाहतुकीचे पुणे परवाना चाचणीत ‘नापास’

अनामिका ही लुंकड यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. तिने तिच्या साथीदारांसोबत मिळून लुंकड यांचा मुलगा आणि सुनेला चहा व कॉफीमधून गुंगीकारक औषध दिले. दोघांना बेशुद्ध करून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.