पुणे : सिंहगड पायथा परिसरातून शासकीय ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून करणारा मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोल्हापूरातून अटक केली. पोळेकर खून प्रकरणात भामे गेले दोन महिने पसार होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंहगड पायथा परिसरातील डोणजे गावातील पोळेकरवाडीत विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०) राहायला होते. आरोपी योगेश भामे डोणजे परिसरात राहायला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्याने पोळेकर यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी भामे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी पोळेकर यांचे मोटारीतून अपहरण केले. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार करुन खून केला. खून केल्यानंतर अवयव खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते. याप्रकरणात भामे याचे साथीदार शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचली गुरव, जि . अहिल्यानगर) आणि मिलिंद देवीदास थोरात ( वय २४, र. बेलगाव , अहिल्यानगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मुख्य सूत्रधार भामे पसार झाला होता. गेले दोन महिने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

हेही वाचा – पुणे: शरद मोहोळ टोळीचा सदस्य विकीला पिस्तुलासह हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भामे कोल्हापुरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पोळेकर यांच्या खुनामागचे नेमके कारण काय ? फरार झाल्यानंतर तो कोठे वास्तव्यास होता ? त्याला आश्रय काेणी दिला, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, आदी पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचा – मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल चित्रीकरणाचा प्रकार, शाळेतील शिपायाविरुद्ध गुन्हा शाळेचा शिपाई अटकेत

आश्रयदाते सहआरोपी

बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गुंड योगेश भामे गेले दोन महिने फरारी होता. त्याला आश्रय देणारे, तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main mastermind in the construction businessman murder case has been arrested kidnapping for ransom of two crores pune print news rbk 25 ssb