पुण्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. यात ४ वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. सुदाम भोंडवे, त्यांची पत्नी सिंधू सुदाम भोंडवे, नात आनंदी अश्विन भोंडवे व सून कार्तिकी अश्विन भोंडवे अशी मृतांची नावं आहेत. मुलगा अश्विन सुदाम भोंडवे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिरूरमध्ये उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचुर झाला. अपघातात सर्व कुटुंबीय कारमध्ये अडकून पडले. स्थानिक आणि पोलिसांनी जखमींना वाहनातून बाहेर काढलं. मात्र, सुदाम भोंडवे, सिंधू भोंडवे, आनंदी भोंडवे यांचा अपघातानंतर जागेवरच मृत्यू झाला.

अपघात कसा घडला?

भोंडवे कुटुंब इंडिका कारमधून बीडहून पुण्यातील चाकण भागातील अश्विन भोंडवे यांच्या मेव्हुण्याच्या घरी जात होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अहमदनगर-पुणे महामार्गावर फलके मळ्याजवळ उभ्या असणाऱ्या एका ट्रकवर कार आदळली. यात चालक अश्विन भोंडवे जखमी झाले, तर त्यांचे आई-वडील आणि चार वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. पत्नी कार्तिकी भोंडवे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी अहमदनगरमधील रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : अमरावती : एसटी बसची ट्रकला धडक, ३२ प्रवासी जखमी

या प्रकरणी पोलिसांनी कंटेनरचा चालक बबलू लहरी चौहान (उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

भोंडवे कुटुंबाचं शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं काम

भोंडवे कुटुंब मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. सुदाम भोंडवे यांनी बीडमधील डोमरी येथे सोनदरा गुरुकुल नावाची शाळा सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून मुलांना नवनव्या शिक्षण पद्धतींचा वापर केला जातो. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठीही उपक्रम राबवले जातात.

बीडमधील अनेक कुटुंबं वर्षातील सहा महिने उसतोडीच्या कामासाठी जिल्हा सोडून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये भटकंती करतात. त्यामुळे त्यांच्या मुलांचेही यात हाल होतात. त्यावर उपाय म्हणून १९८६ मध्ये सोनदरा गुरुकुलची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला बीड केंद्रित सोनदरा गुरुकुल या निवासी शाळेला नंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना या शाळेने घडवलं. सद्यस्थितीत येते १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major accident in shirur on ahmednagar pune highway many dead from bhondve family beed pbs