पुणे : अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तन उपाय क्षेत्रातील ‘यूएसटी’ कंपनीने पुण्यात गुंतवणूक केली आहे. कंपनीने पुण्यात नवीन कार्यालय सुरू केले आहे. यामुळे कंपनीचे भारतातील जाळे अधिक मजबूत होणार आहे. या कार्यालयीन विस्तारातून पुढील ३ ते ५ वर्षांत पुण्यात सुमारे ३ हजार ५०० ते ६ हजार नोकऱ्या निर्माण करण्याची योजना कंपनीने आखली आहे.

पुण्यातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘यूएसटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा सुधींद्र यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यपालन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस, मुख्य मूल्य अधिकारी सुनील बालाकृष्णन, ‘यूएसटी’ उत्पादन अभियांत्रिकीचे प्रमुख व पुण्यातील कार्यालयाचे प्रमुख रामप्रसाद संथानगोपालन, कंपनीचे उपाध्यक्ष व टॅलेंट अॅक्विझिशन विभागाचे जागतिक प्रमुख किशोर कृष्णा, डिझाइन व एक्सपेरियन्स प्रॅक्टिस विभागाच्या उपप्रमुख स्मिता सूर्यप्रकाश, महाव्यवस्थापक शेफी अन्वर, ‘यूएसटी’चे कार्यस्थळ व्यवस्थापन व कार्यसंचालन या विभागाचे वरिष्ठ संचालक हरी कृष्णन मोहनकुमार, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि इतर सहकारी उपस्थित होते.

‘यूएसटी’ने बालेवाडी येथील ईक्यू स्मार्टवर्क्स संकुलात नवीन कार्यालय सुरू केले असून, ते ८० हजार चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. तेथे एक हजारपेक्षा जास्त आसनक्षमता आहे. हे कार्यालय पुण्यातील साई राधे कॉम्प्लेक्स येथील विद्यमान कार्यालयास पूरक ठरणार आहे. ‘यूएसटी’च्या ‘पुणे सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये सध्या दोन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, ते डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोग यातील सखोल तज्ज्ञतेचा उपयोग करून नाविन्याला चालना देत आहेत, तसेच व्यवसायवृद्धी गतीमान करीत आहेत. फिनटेक, हेल्थकेअर व लाइफ सायन्स, रिटेल व ई-कॉमर्स, उत्पादन व ऑटोमोटिव्ह यांसारख्या उद्योगांतील आघाडीच्या जागतिक कंपन्यांना सेवा देणारे हे पुणे केंद्र यूएसटीच्या जागतिक ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

‘यूएसटी’चे मुख्य कार्यपालन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस म्हणाले की, पुण्यात नवीन कार्यालयाच्या उद्घाटन होणे हा भारतातील आमच्या सातत्यपूर्ण वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या धोरणात्मक विस्ताराद्वारे आम्ही डिजिटल परिवर्तन क्षेत्रातील व्यवसायाच्या गरजांसह बाजारातील संधींशी जुळवून घेत आहोत. आमची कार्यपद्धती मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे नियोजन करीत आहोत. एआय, डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आमच्या वाढत्या संघांना सहाय्य करण्यासाठी सक्षम प्रतिभावंत कर्मचाऱ्यांचा समूह उभारणे, व्यवसाय सल्लागारांची साखळी निर्माण करणे, धोरणात्मक भागीदारी करणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यावर आमचा भर आहे.

कंपनीचे विस्तावर लक्ष

पुढील तीन वर्षांत ‘यूएसटी’ भारतातील आपल्या कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्येत सातत्यपूर्ण वाढ करणार आहे. कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेली यूएसटी ही १९९९ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून, भारतातील तिचे मुख्यालय तिरुअनंतपुरम येथे आहे. बंगळुरू, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, कोची, पुणे, मुंबई, चेन्नई, कोइमतूर, दिल्ली, अहमदाबाद आणि होसूर यांसारख्या प्रमुख ठिकाणी तिची कार्यालये आहेत. सध्या भारतात २० हजारांहून अधिक कर्मचारी ‘यूएसटी’सोबत कार्यरत आहेत.