पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालेकिल्ला पिंपरी-चिंचवड शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी राजीनामे दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राजीनामा पाठविला आहे. अपरिहार्य कारणास्तव राजीनामा दिल्याचे पत्रात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. भोसरीत भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपलाच सुटण्याचे निश्चित आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही समस्या मांडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची समर्थक माजी नगरसेवकांसह भेट घेतली होती. त्यानंतर आता गव्हाणे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनीही राजीनामे दिले आहेत. गव्हाणे यांनी राजीनामा देणे अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा…मनोरमा खेडकर यांच्याकडून पोलीस, मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी; आणखी एक चित्रफीत प्रसारित

शरद पवार गटात प्रवेश?

आता राजीनामा दिल्याने गव्हाणे हे लवकरच पक्ष सोडतील अशी चिन्हे आहेत. शनिवारी पिंपरीत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात गव्हाणे हे प्रवेश करण्याची शक्यता आहे. गव्हाणे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major setback for ajit pawar as key ncp leaders resign in pimpri chinchwad ahead of assembly elections pune print news ggy 03 psg