लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा: सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. खंडाळा घाट क्षेत्रात वाहतूक संथ झाल्याने कोंडीत भर पडली. पर्यटनासाठी बाहेर पडल्यानंतर वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी (१ मे) सार्वजनिक सुट्टी आहे. महाराष्ट्र दिनाला जोडून शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने शनिवारपासून द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात पुणे-मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने कोंडीत भर पडली. खंडाळा घाट क्षेत्रात वाहतूक संथ गतीने सुरू असून ठिकाठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळले. घाटक्षेत्रातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

मुंबई-पुणे मार्गिकेवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडलेले नागरिक कोंडीत अडकल्याने त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर शनिवारी रात्री घाटक्षेत्रात कोंडी झाली होती. वाहनचालक कोंडीत अडकून पडले होते. घाटक्षेत्रात मोटारींचे इंजिन तापल्याने जवळपास शंभर वाहने बंद पडली होती. मोठ्या संख्येेने मोटारी दाखल झाल्याने कोंडी सोडविताना पोलिसांची धावपळ उडाली. प्रवाशांकडील पाणी संपल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिकेला जाण्यास जागा उपलब्ध नव्हती. कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच लहान मुलांचे हाल झाले.

आणखी वाचा- अंमली पदार्थ तस्करांकडून दोन कोटी २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त

रविवारी सकाळपासून द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात दहा मिनिटे वाहतूक थांबवून पुणे मार्गिकेवरील वाहने मुंबई मार्गिकेवर थांबवण्यात येत आहेत. विरुद्ध दिशेने वाहनांना सोडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत. द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने मोटारी आणि चारचाकी वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे महामार्ग पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी सांगितले.

खोपोली, लोणावळ्यातील वाहतूक विस्कळीत

द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्यास वाहनचालक खोपाली आणि लोणावळा-खंडाळा शहरातून पर्यायी मार्गाचा वापर करुन जातात. द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास लोणावळा, खंडाळा, खोपोली शहरातील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागतात. रविवारी लोणावळा, खंडाळा तसेच खोपोलीत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आणखी वाचा- राजभवनच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेणारे चोरटे गजाआड

खंडाळा बोगदा परिसरात वाहतूक नियोजन

सलग तीन दिवस सुट्टया असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. वाहतूक कोंडी सोडिवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी खंडाळा बोगदा परिसरात प्रत्येकी दहा मिनिटांचा ‘ब्लॉक’ (वाहने थांबवून) टप्याटप्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा मार्गिकेवरुन सोडली जात आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गिकेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major traffic jam on the expressway pune print news rbk 25 mrj
Show comments