गेली १५ वर्षे पिंपरी पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. या कालावधीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचे काम केले आहे, अशी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निगडीत केली.
भाजपचे संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांच्या पुढाकाराने यमुनानगर येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, वसंत वाणी, नगरसेवक शीतल शिंदे, सीमा सावळे, आशा शेंडगे, प्रमोद निसळ, नामदेव ढाके, राजू दुर्गे आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त पवार यांनी एक लाखाचा धनादेश जलयुक्त शिवार योजनेसाठी मुनगंटीवार यांच्याकडे दिला. पुढील निवडणुकीत एकनाथ पवार नक्की आमदार होतील, अशा शुभेच्छा मुनगंटीवार यांनी दिल्या.
मुनगंटीवार म्हणाले, आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकू, २०१७ मध्ये पिंपरीत भाजपचा महापौर असेल. पालिका निवडणुकीची संपूर्ण धुरा आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे राहणार आहे, कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठिशी राहावे. आगामी काळात पिंपरीत भाजप सशक्त होईल. केवळ पिंपरी पालिका नव्हे तर येत्या विधानसभा निवडणुकातही शहरात भाजपचा झेंडा फडकेल. भाजप कार्यकर्त्यांनी सत्तेचा माज करू नये, सामान्यांची कामे करावीत.
—तर, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली नसती!
दरोडेखोरांना लाजवेल, अशा पध्दतीने काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्याचा कारभार केला व तिजोरीवर दरोडे घातले. दोन्ही काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी खोटेपणाचा कळस गाठला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात शरद पवार आता राज्याचा दौरा करत आहेत. हेच काम त्यांनी १५ वर्षांपूर्वी केले असते, तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.
-सुधीर मुनगंटीवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा