त्या उत्तुंग हिमशिखरावर त्यांनी ८३०० मीटपर्यंत झेप घेतली होती. पण कमी पडलेल्या दोरामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना माघार घ्यावी लागली. पण या जिद्दी गिर्यारोहकांनी तळाशी पोचल्यावर पुन्हा नव्या दमाने, साधनांसह या हिमशिखराकडे झेप घेतली. ..ही साहसकथा आहे, जगातील पाचवे सर्वोच्च शिखर माउंट मकालू आणि त्याचा शिखरमाथा गाठू पाहणाऱ्या ‘गिरिप्रेमी’च्या  मराठी गिर्यारोहकांची!
पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेतर्फे एव्हरेस्ट, ल्होत्से शिखरांपाठोपाठ यंदा  ८४८१ मीटर उंचीच्या मकालू शिखरावर मोहीम काढण्यात आली आहे. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आशिष माने, आनंद माळी आणि अजित ताटे हे गिर्यारोहक यामध्ये सहभागी झाले आहेत. यातील आशिष माने आणि आनंद माळी यांनी गेल्या १७ मेच्या सकाळपर्यंत या शिखराच्या अगदी माथ्यापर्यंत (८३०० मीटर) झेप घेतली. पण नेमक्या याच वेळी पुढील चढाईसाठी लागणारा दोर त्यांना अपुरा पडला. केवळ दोर कमी पडल्यामुळे या गिर्यारोहकांना नजरेसमोर आलेली शिखरचढाई सोडून खाली उतरावे लागले. ८३०० मीटपर्यंतची ही चढाई केवळ दोराअभावी निष्फळ ठरली होती. निराश मनाने हे गिर्यारोहक मकालूच्या तळावर पोहोचले. हा तळ गुंडाळून भारतात परतण्याची तयारी सुरू असतानाच झिरपे यांना भारतीय हवामान विभागाकडून या शिखरावर चढाईसाठी २६ मे हा आणखी एक ‘क्लिअर विंडो’चा दिवस असल्याचे सांगण्यात आले. अतिउंचीवरील चढाईसाठी चांगल्या हवामानाचा अंदाज असणाऱ्या दिवसाला गिर्यारोहकांच्या भाषेत ‘क्लिअर विंडो’ म्हणतात. २६ मे ची ही संधी समजताच या गिर्यारोहकांनी पुन्हा जिद्द एकवटली आणि चढाईचा निर्धार केला. मोहिमेसाठी लागणारे साहित्य काठमांडू येथून मिळवण्यात आले. आज गुरुवारी सकाळीपासून पुन्हा नव्याने मोहिमेला सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी चार पर्यंत या गिर्यारोहकांनी ‘कॅम्प २’ पर्यंत मजल मारली आहे. उद्या, परवा उर्वरित चढाई केल्यावर शिखरमाथा गाठण्याचे त्यांचे नियोजन आहे.
आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या हिमशिखरांना गिर्यारोहकांच्या भाषेत ‘एट-थाऊजंडर्स’ असे म्हणतात. या उंचीवर मानवी शरीराला धोका असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते. अशी जगात १४ शिखरे आहेत. यातील सर्वोच्च अशा पाचव्या शिखरावर ८ हजार मीटरच्यावर हे गिर्यारोहक सलग दुसऱ्यांदा चढाई करत आहेत. गिर्यारोहण जगात ही एक विलक्षण घटना मानली जात आहे. यामुळे या मोहिमेकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.