लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व भोजनगृहांत एकाच दर्जाचे भोजन उपलब्ध होण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करण्याची मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी केली आहे. तसा ठराव मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील वसतिगृहात गांजा सापडण्याच्या प्रकरणानंतर अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचीही मागणी अधिसभा सदस्यांनी केली आहे.
विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा २२ मार्च रोजी होत आहे. या अधिसभेची कार्यक्रमपत्रिका अंतिम करण्यात आली आहे. त्यात अधिसभा सदस्यांनी विविध विषयांवर ठराव मांडले आहेत. गेल्या काही काळात विद्यापीठातील वसतिगृहांत उंदीर, ढेकणांच्या प्रादुर्भावाचा विषय गाजला होता. तसेच, भोजनात अळी, झुरळे सापडण्याचेही प्रकार समोर आले आहेत. अशाच एका प्रकारानंतर विद्यार्थी संघटनेने एक भोजनगृह बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात आता मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करण्याचा ठराव अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस यांनी मांडला आहे.
तसेच, विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे अमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी, असे प्रकार विद्यापीठात घडू नयेत यासाठी अधिसभा सदस्य डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्याचा ठराव मांडला आहे.
विद्यापीठातील प्लेसमेंट सेल आणि करिअर समुपदेशन कक्षासाठी पूर्ण वेळ अधिकारी देण्याच्या मागणीचा ठराव अधिसभा सदस्य राहुल पाखरे यांनी मांडला आहे. विद्यापीठातील अध्यासनांच्या कामकाजाचा आढावा प्रत्येक अधिसभेपुढे नियमितपणे ठेवण्याचा ठराव जयंत काकतकर यांनी मांडला आहे. विद्यापीठाने जगातील गरजू देशांमध्ये ऑफशोअर कॅम्पस सुरू करावेत, त्यासाठी विद्यापीठात स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा ठराव विनायक आंबेकर यांनी मांडला आहे. तर, विद्यापीठातर्फे नेमल्या जाणाऱ्या विविध समित्यांमध्ये सदस्य समावेशाबाबतचे, एका सदस्याने एका वर्षात किती समित्यांवर काम करावे, या संदर्भात स्पष्ट निकष ठेवण्याची मागणी डॉ. सुनील लोखंडे यांनी केली आहे.
‘जीवनसाधना गौरव’साठी निकष निश्चितीचा ठराव
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी विद्यापीठाकडून जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्यात येतात. मात्र, यंदा हे पुरस्कार घाऊक स्वरुपात देण्यात आल्याने पुरस्कार बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्यासाठी निवड समिती नियुक्त करून समितीने निवडलेल्या व्यक्तींचाच विचार पुरस्कारासाठी करण्याचा ठराव डॉ. भागुजी निगळे यांनी, तर बाळासाहेब सागडे यांनी जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी काही निकष निश्चित करण्याचा ठराव मांडला आहे.