श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com
झोपल्यानंतर जशी आपल्याला स्वप्नं पडतात, तशीच स्वप्न पण ती उघडय़ा डोळ्यांनी पाहणे आणि ती सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे कार्यही अनेक जण करतात. अशीच स्वप्न पाहणाऱ्यांना साहाय्यभूत होणारी ‘मेक माय ड्रीम फाउंडेशन’ ही संस्था दशकापासून कार्यरत आहे. समाजातील अनेक दिव्यांग आणि आर्थिकदृष्टय़ा कमकुमवत गटांना ही संस्था मदतीचा हात देते.
तो भराभरा पर्वती देखील चढतो आणि तो ट्रेकिंगही करतो. ती राजमाची सहजतेने सर करते तर पुरंदरची चढाई देखील करते. कोणतेही कष्टदायक भाव त्यांच्या चेहऱ्यावर तर नाहीतच आणि देहबोलीही सकारात्मक. त्याचे किंवा तिचे विशेषत्वाने कौतुक करण्याचे कारण म्हणजे, त्याचे आणि तिचेही मित्रमैत्रिणी, जी देखील त्या दोघांसारखीच दिव्यांग आहेत. धडधाकट माणसे देखील सर्व अवयव जागच्याजागी असताना, चार पावले चालायचे म्हणले तरी कंटाळा करतात. पण ज्यांना कुबडय़ा, कृत्रिम अवयव यांच्या मदतीशिवाय चालताही येत नाही, ते आपले जीवन सकारात्मकतेच्या दिशेने नेताना रस्यावरून चालणेच काय, पण किल्ले सर करण्यातही मागे हटत नाहीत अर्थात हे सगळे घडते आहे, ‘मेक माय ड्रीम फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकारामुळे. प्रत्येकाचेच एक स्वप्न असते तशीच स्वप्न या दिव्यांगांचीही आहेत आणि इतकेच नाही तर ते आर्थिकृष्टय़ा दुर्बलही आहेत. अशांचे पुनर्वसन हाच या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
शारीरिक तसेच इतर व्यंग असलेल्या व्यक्तींना समाजामध्ये मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी त्यांना शारीरिक आणि वेळप्रसंगी मानसिक सक्षमीकरण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू. २७ मार्च २००९ या दिवशी ही संस्था कार्यान्वित झाली. समाजातील अव्यंग लोकांनी, व्यंग व्यक्तींच्या मूलभूत प्रश्नांवर मार्ग काढताना, अशा व्यक्तींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक संधी निर्माण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे आणि एका पुनर्वसन केंद्राची उभारणी करणे या उद्देशाने या संस्थेच्या संस्थापिका आणि कार्यकारी विश्वस्त असणाऱ्या मेधा कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.
दिव्यांगांसाठी संस्थेमार्फत विविध कामे केली जातात. त्यातील पहिल्या टप्प्यामधील प्रकल्पांतर्गत, संस्था दहावी पास मुलांना उच्च किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण देत असून वैशिष्टय़पूर्ण समुपदेशनाद्वारे त्यांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत आहे. संस्थेने आतापर्यंत पंचेचाळीस मुलांचे पुनर्वसन केले असून पुनर्वसन कार्यक्रमांतंर्गत मुलांना मूलभूत तसेच उच्च शिक्षण, निवास -भोजन, प्रवासखर्च व इतर आवश्यक बाबींसाठी आíथक मदत केली जाते. तसेच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. त्यांना ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित केले जाते.
संस्थेत दाखल होणाऱ्या मुलांची प्रथम ज्ञान प्रबोधिनीमध्ये कलक्षमता चाचणी (अॅप्टिटय़ुट टेस्ट) करून घेतली जाते आणि मुलांना त्यांच्या कलक्षमतेनुसार आणि उपलब्ध पर्यायानुसार ती काय करू शकतील यासाठी समुपदेशन केले जाते. आपल्याला पुढे काय शिकायचे आहे याची निवड मुलेच करतात आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण दिले जाते. मुलांनी सर्वसामान्यांप्रमाणे प्रवाहाबरोबर चालावे यासाठी पुणे शहरातील दर्जेदार कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. संस्थेची मुले इंजिनिअरींग, शास्त्र, कला, वाणिज्य, फाइन आर्ट, संगणकशास्त्र, बालवाडी शिक्षिका, पेंटिंग, पाकशास्त्र, टुरिझम, इलेक्ट्रॉनिक अशा विविध क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात. आतापर्यंत संस्थेने मदत केलेल्या पंचेचाळीस मुलांमधील तीस मुले सध्या पूर्ण वेळ आणि अर्ध वेळ नोकरी करून काही जण पुढील शिक्षण घेत आहेत तर काही जण आयुष्यात स्थिरावत आहेत. या टप्प्यावर काही मुलं लग्न करून समाधानी आयुष्य जगत आहेत, तर काही मुलं सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.
संस्थेच्या प्रस्तावित प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे संस्थेला एक पुनर्वसन केंद्र सुरू करायचे आहे. त्याचे स्वरूप गुरुकुलासारखे असेल.
मुलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी संस्था किल्ले चढाई उपक्रम घेते. आतापर्यंत पर्वती-राजमाची-सिंहगड-पुरंदर चढाई असे उपक्रम संस्थेने राबविले आहेत. याशिवाय पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमधून चित्रकला तसेच संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांगांच्या प्रश्नांची जाणीव समाजाला व्हावी, या उद्देशाने संस्थेमार्फत विविध प्रकारच्या दिव्यांग मुलांनी नेतृत्व केलेल्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेने आतापर्यंत पाच दिव्यांग मुलांसाठी योग्य बदल करून दुचाकी वाहनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुलांना वाचनासाठी २०१२ पासून विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह असलेले ग्रंथालय संस्थेने सुरू केले असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेतात. संस्थेतील विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी, आरोग्य-शारीरिक तंदुरुस्ती, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास यासाठी विविध मार्गदर्शकांच्या व्याख्यानांचे संस्थेमार्फत करण्यात येते. याशिवाय मुलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कागदी पिशव्या, पाकिटे, भेटकार्डही तयार केली जातात.
दिव्यांग विद्यार्थ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा विचार मनात ठेवून कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या कार्यात सहभागी व्हायचे असेल, तर ९४०४४६१५९१ किंवा (०२०) २५४६८५८० या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधता येईल.