गेल्या सात वर्षांची आकडेवारी पाहता शहरात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय रीत्या घट झाली आहे. यातही १५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्येच मलेरियाचे रुग्ण अधिक दिसत आहेत. तसेच आतापर्यंतच्या मलेरियाच्या रुग्णांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचेच प्रमाण अधिक आहे.
२००८ पासून आतापर्यंत शहरात मलेरियाचे ६३३ रुग्ण आढळले. यात पहिली तीन वर्षे मलेरियाच्या रुग्णांची संख्या कायम राहिली, तर २०११ पासून या संख्येत घट व्हायला सुरू झाली. २०१३ मध्ये मलेरियाचे सर्वात कमी रुग्ण सापडले होते. गेल्या वर्षी प्रामुख्याने संगमवाडी आणि ढोले-पाटील रस्ता या भागात मलेरियाचे रुग्ण आढळले. त्या खालोखाल औंध, कर्वे रस्ता, टिळक रस्ता आणि बिबवेवाडीतही मलेरिया प्रामुख्याने आढळला होता.
पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ‘‘नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कन्ट्रोल प्रोग्रॅम’ अंतर्गत (एनव्हीबीडीसीपी) मलेरियासाठी ‘अॅक्टिव्ह सव्र्हेलन्स’ची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार शहराच्या विविध भागात मलेरियाविषयी जनजागृती करण्याबरोबरच तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते. तापाच्या रुग्णांबरोबरच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. रक्ताचे नमुने घेण्यासाठी पालिकेच्या सेवेतील परिचारिका व मलेरिया कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे नमुने कसब्यातील निदान प्रयोगशाळेत पाठवले जातात. पालिकेच्या डॉक्टरांनाही ‘एनव्हीबीडीसीपी’चे प्रशिक्षण दिले आहे.’’
पुरुष रुग्ण अधिक
२०११ मध्ये आढळलेल्या मलेरियाच्या एकूण ९४ रुग्णांपैकी ५५ रुग्ण पुरुष तर ३९ स्त्री रुग्ण होते. २०१२ आणि २०१३ मध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. २०१२ मध्ये ७८ रुग्ण सापडले होते. त्यापैकी ५१ पुरुष तर २७ स्त्रिया होत्या. तसेच २०१३ मध्ये आढळलेल्या ४७ रुग्णांपैकी ३७ पुरुष आणि १० स्त्री रुग्ण होते.
मलेरियाची आकडेवारी-  
वर्ष                           २००८    २००९    २०१०    २०११    २०१२    २०१३    २०१४
मलेरियाचे रुग्ण        १३७       १३७     १३७        ९४       ७८       ४७        ०३
मलेरियामुळे मृत्यू      ०१            ०१        ००        ००        ००        ००         —
(स्रोत- कीटक प्रतिबंधक विभाग, मनपा)
चाचण्या करणाऱ्या तंत्रज्ञांची वानवा
तापाच्या रुग्णांच्या रक्ताचा नमुना घेऊन तो मलेरियासाठी तपासण्याची यंत्रणा पालिकेकडे आहे. पण हे नमुने तपासण्यासाठी पालिकेकडे केवळ ५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ असून शहरासाठी ही संख्या तोकडी आहे. ही पदे वाढवून मिळावीत यासाठी कीटक प्रतिबंधक विभागाने प्रस्ताव पाठवला असून त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. रक्ताचा नमुना घेण्याचे काम पालिकेचे मलेरिया कर्मचारी करतात. सध्या असे ६० कर्मचारी कार्यरत असून अजून २० मलेरिया कर्मचाऱ्यांची शहराला गरज आहे.

Story img Loader