दत्ता जाधव
आफ्रिकेतील मालावी देशातील मालावी आंबा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) वाशी मार्केटमध्ये आंबा दाखल झाला. पुढील महिनाभर या आंब्याची आवक होईल, अशी माहिती बाजार समितीतून देण्यात आली.
हेही वाचा >>>पुणे: परराज्यातून येऊन शहरात दुचाकी चोरी; चोरट्याकडून चार दुचाकी जप्त
बाजार समितीचे संचालक आणि आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई बाजार समितीत शुक्रवारी तीन किलोच्या २७० पेट्यांची आवक झाली. येत्या महिनाभरात सुमारे ४० टन आंबा मुंबईत दाखल होईल. इंधनाचे दर वाढल्यामुळे हवाई वाहतूक महाग झाली आहे. त्यासह आयात आणि अन्य करांमुळे आंब्याचे दर वाढले आहेत. मालावी आंबा तीन किलोच्या पेट्यांमधून आला असून, एक पेटी ३६०० ते ४५०० रुपये दरांने होलसेल विक्री झाली आहे. मागणी चांगली असल्यामुळे काही तासाच आयात झालेल्या सर्व आंब्यांची विक्री झाली आहे. या पेट्या कुलाबा, कफ परेड आणि कॉफर्ड मार्केट येथील होलसेल व्यापाऱ्यांनी विकत घेतल्या आहेत. पुढील महिनाभर आठवड्यातून दोन वेळा आंब्याची आयात होणार आहे. आयात वाढत्यानंतर हा आंबा अहमदनगर, सुरत, बेळगाव आदी बाजार समितीत विक्रीसाठी पाठविला जाणार आहे. देवगड हापूसला ज्या ठिकाणी मागणी असते, त्या ठिकाणी हा आंबा पाठविण्याचे नियोजन आहे.आफ्रिकेतील या मालावी आंब्याला अमेरिका, आखाती देश आणि मलेशियात मोठी मागणी असते, त्यामुळे मालावी आंब्याचे दर कायमच चढे असतात, असेही पानसरे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे: ‘महाराष्ट्राची एक इंचही जागा जाता कामा नये’; अजित पवार यांचे वक्तव्य
रत्नागिरीतून गेला अन् मालावी हापूस झाला
या मालावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. सुमारे अकरा वर्षांपूर्वी रत्नागिरीतून कलमे करण्यासाठी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या (काड्या) मालावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून सुमारे २६ एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन आता ६०० हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. या आंब्याला मालावी हापूस असेही म्हटले जाते. हे आंबे २०१८मध्ये प्रथम देशात आयात केले होते. २०१८मध्ये ४० टन आंबे नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये आले होते. ज्याची किंमत १५०० रुपये प्रति ३ किलो बॉक्स होती. २०१९ मध्ये सुमारे ७० टन आंबे पोहोचले आणि २०२० मध्ये करोनासाथीमुळे प्रति बॉक्स सुमारे ३००० रुपये दराने फक्त पंधरा टन आयात करण्यात आला होता.
हेही वाचा >>>पुणे: हडपसर भागातील व्यापाऱ्याचे अपहरण; व्यापाऱ्याला मुंबईत सोडून आरोपी पसार
देवगड हापूसला फटका नाही
मालावी देशात आंब्याचा हंगाम ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये असतो. या काळात येथे आंबे काढले जातात. त्यावेळी देवगड हापूस बाजारात नसतो. त्यामुळे देवगड हापूस आणि मालावी आंब्यामध्ये कोणतीही स्पर्धा असत नाही. कोकण पट्ट्यातील विविध भागांतून आगाप (पूर्व हंगामी) हापूस आंबा जानेवारीनंतर बाजारात येतो. या वर्षी यंदा डिसेंबरअखेरपर्यंत मालवी आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे.