पुणे / बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) उतरण्याची शक्यता आहे. ‘शेतकरी ही निवडणूक लढविण्यास तयार असतील तर, आम्हीही त्यांच्या पाठीशी राहून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू,’ असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या साखर कारखान्याची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना मतदारांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही निवडणूक चुरशीची होईल, अशी चर्चा बारामतीमध्ये आहे. अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्यावरील पकड कायम राखणार की, ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांच्याकडून कारखाना खेचून घेणार, याबाबतही उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक लढविण्याचे संकेत दिले.

‘मी स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार नाही. मात्र, कारखान्याचे शेतकरी अस्वस्थ असल्याचे मला दिसत आहेत. अनेक शेतकरी मला भेटतात. कारखान्यातल्या अडीअडचणी समजावून सांगतात. यामध्ये शेतकऱ्यांची कृती समिती असेल तर मी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहीन. बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती नैतिक जबाबदारी आहे,’ असे सुळे म्हणाल्या.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारण आणायचे नाही. काही गोष्टी राजकारणापासून बाजूलाच ठेवल्या पाहिजेत. कुठलाही राजकीय पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवू इच्छित नाही. मात्र, कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अन्याय झाला असे वाटत असेल आणि ऊस उत्पादक शेतकरी निवडणूक लढवायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारावेळी राष्ट्रवादी ( शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मागील इतिहास पाहता कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा एक पॅनल कार्यरत असून, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे बाळासाहेब तावरे आणि विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांचा पॅनल कारखान्याच्या सत्तेवर आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरद पवार) निवडणूक पॅनल तयार करून कारखान्याची निवडणूक लढविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon sahakari sakhar karkhana election ncp ajit pawar vs ncp sharad pawar pune print news apk 13 css