भीमाशंकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱयाखालून आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राज्याचे पुनर्वसनमंत्री पंतगराव कदम यांनी ही माहिती दिली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. बुधवारपासून घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे(एनडीआरएफ) जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. या दुर्घटनेतून ८ जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, माळीण गावातील लोकांचे पुनर्वसन कसे करायचे, यासाठी शुक्रवारी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
क्षणात होत्याचे नव्हते..
गेल्या चार दिवसांपासून त्या ठिकाणी प्रचंड पाऊस कोसळत होता.. डोंगर उतारावरच असल्याने गावातील लोकांनाही या कोसळत्या जलधारा सवयीच्या. मात्र बुधवारच्या दिवशी त्यांच्यासाठी या जलधारा काळ बनूनच आल्या. पावसाच्या मुसळधारांनी डोंगरच फोडला आणि त्याची भलीमोठी दरड गावावर लोटून दिली.. क्षणार्धात त्या दगड-मातीने अख्ख्या गावाचा घास घेतला.. ‘माळीण, ता. आंबेगाव, जि. पुणे’ हा या गावाचा
पत्ता शब्दश: मातिमोल झाला!
बुधवारी पहाटे संपूर्ण गाव गाढ झोपेत असतानाच काळाने गावावर क्रूर घाला घातला. या दुर्घटनेत आतापर्यंत २१ जण मृत्युमुखी पडले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या(एनडीआरएफ) जवानांना या दुर्घटनेतील आठ जणांना वाचवण्यात यश आल्याचे समजते.
गावाची लोकसंख्या जेमतेम ४००-५००. त्यातही मूळ गाव आणि आजूबाजूच्या वाडय़ांचा समावेश. एका बाजूला उंच डोंगर आणि खालच्या बाजूला ओढा अशा बेचक्यात हे माळीण गाव वसलेले. चार दिवसांपासून या परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरू होता. बुधवारी पहाटे डोंगरावरून मोठय़ा प्रमाणात दगड-चिखल वाहात आला. त्या ढिगाऱ्याखाली गावातील ५०-६० घरे गाडली गेली. येथे एक गाव होते, ते गाडले गेले हे सांगायलाही कोणी उरले नाही. ती बातमी समजली ती एका एसटी चालकामुळे.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी संध्याकाळी माळीणला भेट दिली. जखमी व्यक्तींना देण्यात येत असलेल्या वैद्यकीय उपचारांचीही त्यांनी चौकशी केली.
एसटी होती म्हणून..
अहुपे-मंचर ही एसटी बस येथून रोज जाते. माळीणचे ग्रामस्थ याच गाडीने आंबेगाव या तालुक्याच्या ठिकाणी जात असत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही गाडी माळीण गावाजवळ आली. पण चालकाला ते गावच दिसेना. नजर जाईल तेथे फक्त चिखलच. या धक्क्य़ाने चालक हादरलाच. तशात त्याच्या मोबाईलला रेंज मिळेना. अखेर पुढे जाऊन त्याने माळीणशेजारील असानेच्या ग्रामस्थांना ही माहिती दिली. मग पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतरच माळीण गावावर ओढवलेले संकट समोर आले.
यंत्रणांची धावपळ
दुर्घटनेविषयी कळताच पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक माळीण येथे पोहोचले. धो धो कोसळणारा पाऊस, रस्ता लहान आणि जागोजागी पसरलेला चिखल यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. तरीही रात्री उशिरापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, मदतकार्यात लष्करी जवानांची मदत घेण्यात आली आहे. या ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कामगार आणि कर्मचारीही मदतकार्य करीत आहेत.
दरडी कोसळण्याचा इतिहास..
माळीण येथे यापूर्वीही दरडी कोसळणे, भूस्खलन आणि माती वाहून आल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात २००२-०३ साली माती घसरल्याची किरकोळ घटना घडली होती. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी पावसाळ्यात माती ढासळल्याची घटना घडली होती. मात्र, या घटना फारशा तीव्रतेच्या नव्हत्या. त्या वेळी हानीही झाली नव्हती. दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाने राष्ट्रवादीच्या ट्विटर खात्यावरून मात्र दरड कोसळण्याची ही पहिलीच गोष्ट असल्याचे म्हटले आहे.
दुर्घटनेची व्याप्ती
*दुर्घटना बुधवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली
*सकाळच्या वेळी अचानकच भूस्खलन झाले, त्याखाली गाव गाडले गेले
*मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम.
*मृतांची संख्या अंदाजे १५० ते २०० असण्याची शक्यता
*वाहतूक कोंडी व रस्ता लहान, त्यामुळे मदतकार्यात अडथळे
“सकाळी भूकंप झाल्यासारखे वाटले. टेकडीसारखा काही भाग कोसळत असल्याचे आम्ही पाहिले.”
– गणेश भाऊसुपे, शेजारील गावातील रहिवासी
“दरडीखाली ४४ घरे गाडली गेली असून, त्याखाली १५८ लोक अडकले आहेत. या व्यक्तींमध्ये ६१ मुले, ६० महिला आणि ३७ पुरुषांचा समावेश असण्याची शक्यता आहे.”
संदीप राय राठोड, संचालक, एनडीआरएफ
असे होते माळीण गाव..
*मूळ वस्ती व पाच वाडय़ा मिळून गाव
*पुणे जिल्ह्य़ात डिंभे-अहुपे रस्त्यापासून आत दोन किमी अंतरावर
*गावाची लोकसंख्या ४०० ते ५००
*रहिवासी महादेव कोळी समाजाचे
*गाव एका डोंगराच्या मधोमध उतारावर; खालून ओढा
*गावात फारसे आरसीसी बांधकाम नाही; देऊळ, शाळा, समाजमंदिर व मोजकीच पक्की घरे
*भातशेती आणि हिरडा गोळा करणे हाच मुख्य व्यवसाय
पूर्वीचे निसर्गरम्य माळीण गाव.
‘गूगल मॅप’वरून घेतलेले माळीण गावचे छायाचित्र
पंतप्रधानांना दु:ख
माळीण गावातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
राजनाथसिंह आज माळीणला भेट देणार
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आंबेगावाजवळील दरड कोसळलेल्या माळीण गावाला गुरुवारी भेट देणार आहेत. केंद्र सरकारने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेतली असून राजनाथसिंह घटनास्थळी भेट देत आहेत. त्यांचा मुक्काम बुधवारी रात्री पुण्यात असून गुरुवारी सकाळी ते घटनास्थळी जातील आणि मदतकार्याची माहिती घेतील, असे संबंधितांनी सांगितले. त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे तेथे जाणार आहेत.
राज्यपाल के. शंकरनारायणन, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे.