माळीण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांचे उपचार मोफत करण्यात येणार असून, संपूर्ण गावाचेच पुनर्वसन करण्यात येईल, अशीही माहिती चव्हाण यांनी दिली. बुधवारी सकाळी आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून गावातील घरे मातीच्या ढिगाऱयाखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २५ महिला, २१ पुरूष आणि सात लहान मुलांचा समावेश आहे. अद्याप १०० हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱयाखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि डोंगरावरून वाहत येणारे पाणी यामुळे बचावकार्यात सातत्याने अडथळे येत आहेत. तरीही राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान अहोरात्र मेहनत घेऊन मातीचा ढिगारा हटविण्याचे काम करीत आहेत. मृतदेहांवर जवळील अडिवरे गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

Story img Loader