माळीण येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या स्मृती वृक्षांच्या स्वरूपात जपण्याची योजना जुन्नर तालुक्यात साकारणार आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नावे एक झाड लावून त्याला त्या व्यक्तीचे नाव असलेले ‘माळीण संजीवन स्मारक’ उभारण्याची ही योजना आहे. ती लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मंगेश हाडवळे हे उद्यान उभारणार आहेत. त्याची सुरुवात येत्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) केली जाणार आहे. याबाबत बेनके व हाडवळे यांनी सांगितले, की माळीण घटनेतील मृत लहान थोरांना श्रद्धांजली तरी कशा प्रकारे वाहायची हे सुद्धा समजण्यापलीकडची ही दुर्घटना आहे. त्यामागची कारणे शोधली जातील. अशी घटना इतर गावांतही घडू शकते. बेसुमार वृक्षतोड हे त्याचे कारण आहे. त्यामुळे अशा स्वरूपात मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जुन्नर तालुक्यात ‘माळीण संजीवन स्मारक’ उभारून त्याअंतर्गत जेवढे मृतदेह माळीण गावात सापडतील, तेवढी रोपे लावली जातील. प्रत्येक झाडाजवळ मृत व्यक्तीच्या नावाचा फलक लावला जाणार आहे. या झाडांचे पूर्ण संवर्धन केले जाईल. या उपक्रमामुळे माळीण गाव सर्वाच्या कायम स्मरणात राहील. परदेशात अशा प्रकारची स्मारके आहेत आणि आता सर्वानीच अशा प्रकारची श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. याद्वारे अशा नसíगक आपत्ती टाळण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे, असेही बेनके व हाडवळे यांनी सांगितले.