मुसळधार पाऊस, डोंगरमाथ्यावरुन वाट मिळेल तसे खाली येणारे पाणी, रोरावणारा वारा, कडाडणाऱ्या विजा अशा निसर्गाच्या रौद्रावताराची सवय डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या माळीणवासीयांना झाली आहे. परंतु, तीन वर्षांपूर्वी झालेल्या गावावर कडा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर सावरु पाहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पुनर्वसित माळीण गावची यंदा पहिल्याच पावसात वाताहत झाल्याचे गावाला भेट दिल्यानंतर स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पुनर्वसनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून केलेले दावे फोल ठरले आहेत.
सन २०१४ मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर माळीण ग्रामस्थांचे शेजारील आमडे या गावात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा १ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. आमडे गावात शाळा, आरोग्य केंद्र, समाजमंदिर, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, जनावरांसाठी गोठा आणि ग्रामस्थांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. मात्र पहिल्याच पावसात पुनर्वसित माळीण गावातील रस्ते, सेप्टिक टॅंक आणि भराव घातलेली माती मोठय़ा प्रमाणात खचली आहे. या प्रकाराची जिल्हा प्रशासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली. गावात खडी आणि मोठय़ा दगडांचा भराव घालण्यात आला. परंतु, तोही खचला आहे. काही घरांच्या समोरील भराव सहा-सात फूट खचल्याने अख्खे घरच खचेल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
लोकांमध्ये एवढे भीतीचे वातावरण आहे, की ग्रामस्थांनी पुनर्वसित गावाच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पाच कुटुंबांनी आसरा घेतला आहे किंवा गावकरी आजूबाजूच्या गावात रहायला गेले आहेत. त्यामुळे आठ-दहा घरे सोडल्यास बाकीच्या सर्व घरांना कुलूपच आहे.
पुनर्वसन प्रकल्पांतर्गत आमडे गावात ६७ घरे बांधण्यात आली आहेत. ३५ कुटुंबातील ९५ जण गावात राहतात. घरांना वॉटर प्रूफिंग न केल्यामुळे जोराचा पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी घरांतील भिंतीमध्ये झिरपत आहे. गावकऱ्यांनीच तात्पुरत्या स्वरुपाची घरांना केलेली मलमपट्टी निकामी ठरत आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी काही ठिकाणी व्यवस्थाच नाही आणि काही चेंबर दबली आहेत. रस्ते अशा पद्धतीने खचले आहेत, की त्यांचे नामोनिशाणच शिल्लक राहिलेले नाही. घरात जाण्यासाठी केलेल्या पायऱ्या उंबऱ्यापासून खाली खचल्या आहेत.
पटसंख्या घसरली
गावात बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत माळीणसह चिंचवडी, हातवेज, आमडे, अडिवरे अशा चार गावांतील विद्यार्थी येतात. परंतु, पहिल्या पावसानंतर गांगरलेल्या ग्रामस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती केली आणि गावाच्या पायथ्याशी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरविली जात आहे. सन २०१४ मध्ये या शाळेतील पटसंख्या १०५ होती. सन २०१६ मध्ये शाळेची पटसंख्या ७१ होती आणि आता ती घसरुन केवळ ५७ एवढी झाली आहे.
माळीणमध्ये सीमाभिंत उभारणे, माती वाहून जाऊ नये म्हणून गॅबियन वॉल बांधणे अशी कामे केली जाणार आहेत. ऐन पावसाळ्यात खोदकाम करुन पक्क्य़ा कामांना सुरुवात केल्यास मोठा धोका उद्भवू शकतो. म्हणून तात्पुरत्या स्वरुपाची कामे तज्ज्ञांच्या अहवालानुसार सुरु करण्यात आली आहेत.
– राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी