मॉलमधील चेंजिंग रूमध्ये छुप्या कॅमेऱ्याचा विषय राज्यभर गाजत असताना पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी मॉलमधील अंतर्गत सुरक्षा हा पोलिसांच्या अखत्यारीतील विषय नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, छुप्या कॅमेऱ्याबाबत कोणी तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
गोव्यातील मॉलच्या चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा असल्याचे प्रकार समोर आला होता. त्याबरोबरच कोल्हापूर येथेही अशाच पद्धतीची घटना घडली होती. त्यामुळे चेंजिंग रूमध्ये असलेल्या छुप्या कॅमेऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पुण्यातही मोठय़ा प्रमाणात मॉल असल्यामुळे पोलिसांकडून कोणती दक्षता घेण्यात आली आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडे विचारणा करण्यात आली. त्या वेळी माथूर यांनी सांगितले, की मॉल उभारण्यासाठी महापालिकेचा परवाना लागतो. त्याबाबतचा सर्व कर महापालिकेकडूनच आकारला जातो. मॉलला विविध प्रकारचे परवाने महापालिकेकडून दिले जातात. मॉलमध्ये कोठे कॅमेरे लावलेले आहेत हे तपासण्याची यंत्रणा आमच्याकडे नाही. मात्र, छुपे कॅमेरे लावल्याबाबत कोणी तक्रार केल्यास तत्काळ दखल घेतली जाईल. पुण्यात मोठय़ा प्रमाणात मॉल आणि कपडय़ाची दुकाने असल्यामुळे त्यांची तपासणी करणे शक्य नाही. महापालिकेकडे तपासणी करणारी तांत्रिक अभियंते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे निम्मे काम पूर्ण
शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे निम्मे काम पूर्ण होत आले आहे. पुढील दोन महिन्यांत शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण होईल. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात १४४० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. सध्या शहराचा मध्य भाग असलेले परिमंडळ एक, पिंपरी-चिंचवड परिसर असलेले परिमंडळ तीनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. परिमंडळ दोनचे काम निम्मे झाले आहे. या सीसीटीव्हीमुळे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा