राधा- वय वर्षे अडीच, उंची ७२ सेमी, वजन- फक्त ४.२ किलो. हे कुठल्या दुर्गम भागातील बाळाचे वर्णन नव्हे. पुण्यातल्याच खेडमधून ही मुलगी सोमवारी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आणि अतिकुपोषित असल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. राधाच्या कुपोषणावर वेळीच उपचार न होण्यासाठी तिच्या घरी असलेली अंधश्रद्धा हे एक प्रमुख कारण ठरले असले तरी तिच्या निमित्ताने बालकांना त्यांच्या घराजवळ मिळणाऱ्या पोषणसुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
शासनातर्फे अंगणवाडी स्तरावर चालवली जाणारी ‘ग्राम बाल विकास केंद्रे’ (व्हीसीडीसी) ऑगस्ट २०१५ पासून केंद्र शासनाच्या निधीअभावी बंद करण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालय स्तरावरील ‘चाईल्ड ट्रीटमेंट सेंटर’ देखील (सीटीसी) बंद आहेत. त्यामुळे मुलांचे कुपोषण योग्य आहाराद्वारे रोखून त्यांचे वजन वाढवण्यासाठी विशिष्ट यंत्रणाच राहिलेली नाही.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (आरबीएसके) डॉक्टरांकडून अंगणवाडीत कुपोषित मुलांचे वजन-उंचीवरून निदान केले जाते. अंगणवाडीतील व्हीसीडीसी केंद्रांमध्ये या बालकांना शेंगदाणे व गुळाचा लाडू, अंडी, सोयाबीनचा शिरा वा बिस्किटे असा पोषक आहार दर २ तासांनी दिला जात असे. एका आरबीएसके डॉक्टरांनी सांगितले, ‘कुपोषित बालकांचे पालक गरिबीमुळे मुलांना पोषक अन्न देऊ शकत नाहीत, तसेच अशा बालकाच्या उपचारासाठी रोजगार बुडवून जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जाण्याची त्यांची तयारी नसल्याचे दिसते. वेळेवर पोषण न मिळाल्याने बाळ साधारण कुपोषणातून तीव्र कुपोषणात व पुढे अतितीव्र कुपोषणात जाते. व्हीसीडीसी व सीटीसी पोषणकेंद्रे सुरू झाल्यास हे टाळता येईल.’
कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या,‘राज्यात ३० ठिकाणी ‘चाईल्ड ट्रीटमेंट सेंटर’ सुरू होणार असून ‘न्यूट्रीशनल रीहॅबिलिटेशन सेंटर’च्या (एनआरसी) संख्येत वाढ करण्यात येणार आहे. चाईल्ड ट्रीटमेंट सेंटर पूर्वी केंद्र शासनाच्या मदतीने चालवली जात होती, परंतु ती गतवर्षी बंद झाली. आदिवासी भाग, तसेच कुपोषणाचा प्रश्न अधिक असलेल्या जिल्ह्य़ात आता ती सुरू केली जातील. शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागात कुपोषित मूल आल्यास उपचार उपलब्ध राहतील. ग्राम बाल विकास केंद्रे महिला व बालकल्याण विभागाकडून चालवली जाऊ शकतील का, याची चाचपणी करण्याबाबत कळवले आहे.’
अंधश्रद्धेचा पगडा मोठा!
राधा या अतितीव्र कुपोषित मुलीबाबत तिच्या घरातील अंधश्रद्धा प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. आरबीएसके डॉक्टरांनी वारंवार सांगूनही तिचे पालक तिला ‘देवाचेच आहे’ म्हणून रुग्णालयात दाखल करण्यास तयार नव्हते. अंगणवाडी सेविका व डॉक्टरांनी तिच्या वस्तीतील नागरिकांना हाताशी धरून राधाच्या पालकांवर दबाव आणला व तिला रुग्णालयात दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा