गंभीर तसेच किरकोळ गुन्हय़ातील आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनदार म्हणून न्यायालयात उभे राहण्याचे प्रकार सुरू असतात. पैसे मिळवण्यासाठी असे उद्योग केले जातात. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात विनोद कालोसिया याने बनावट जामीनदार सादर करून न्यायालयाची फसवणूक केली होती. न्यायालयाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तो गेले सात महिने पसार होता. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो राहण्याची ठिकाणे बदलत होता. अखेर खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर कालोसियाला पोलिसांनी सापळा लावून पकडले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कालोसियाविरुद्ध गेल्या वर्षी गावठी दारू बनावटीची दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हय़ात त्याने शिवाजीनगर न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. कालोसियाचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याला जामीनदार म्हणून शेख नावाची व्यक्ती न्यायालयात हजर राहिली. त्याने दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने शेखविरुद्ध आणखी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी शेखला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर कालोसिया पसार झाला. कालोसिया आणि त्याचे कुटुंबीय आळंदी रस्त्यावरील बोपखेल भागात राहायला आहेत. मूळचा उत्तर प्रदेशाचा असलेला कालोसिया पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे उघडकीस आले होते.

गुन्हे शाखेने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली, मात्र कालोसियाचा ठावठिकाणा लागत नव्हता. पुण्यातून पसार झालेला कालोसिया तीन महिने उत्तर प्रदेशातील मूळ गावी मुक्कामी होता. त्यानंतर तो पुण्यात परतला. पोलिसांकडून शोध सुरू असल्याची कुणकुण त्याला लागली होती, त्यामुळे तो पिंपरी, निगडी, भोसरी भागात गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास होता. पोलिसांनी पिंपरी, निगडी, भोसरी भागात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार व्हायचा. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली होती. तो दररोज रात्री उशिरा घरी येत असल्याची पोलीस नाईक इरफान मोमीन आणि श्रीकांत वाघवले यांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी तेथे पाळत ठेवली होती. दोन दिवस पाळत ठेवल्यानंतर कालोसिया पोलिसांच्या हाती लागला. सहायक आयुक्त

समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील,

उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, रिजवान जिनेडी, तुषार खडके, सचिन जाधव, सुधाकर माने यांनी कालोसियाला पकडण्यासाठी परिश्रम घेतले.

दरम्यान, कालोसियाकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याला जामीन मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या काही जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिवाजीनगर न्यायालय परिसरात यापूर्वी बनावट जामीनदार म्हणून उभे राहणाऱ्या काही जणांना पोलिसांनी पकडले होते. पैशाच्या लालसेपोटी बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन देण्याचे प्रकार न्यायालयात सुरू असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

कालोसियाला जामीन राहणाऱ्या शेखने बनावट कागदपत्रे कोठून तयार केली, याबाबत तपास सुरू आहे. तपासात न्यायालयात बनावट जामीनदारांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. ज्या आरोपींना न्यायालयात जामीनदार मिळत नाही, त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर पैसे घेऊन न्यायालयात बनावट जामीनदार प्रतिज्ञापत्र सादर करतात. बनावट कागदपत्र, शिधापत्रिकेत फेरफार करून बनावट जामीनदार न्यायालयाची फसवणूक करतात. कालोसियाला पकडल्यानंतर बनावट जामीनदारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

rahul.khaladkar@expressindia.com

Story img Loader