हिंजवडी येथे पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण कसबे (वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले होते.
प्रवीण कसबेविरोधात त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी समज देण्यासाठी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी समज दिल्यानंतर प्रवीण घरी परतला. घरी गेल्यावर त्याने पुन्हा पत्नीशी भांडण केले. पोलिसांनी माझे काय केले अस म्हणत त्याने पुन्हा पत्नीला शिवीगाळ केली. या प्रकाराने संतापलेल्या सासऱ्यांनी जावयाविरोधात तक्रार करण्यासाठी पुन्हा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यापाठोपाठ प्रवीणही हिंजवडी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस ठाण्यात हवालदार अविनाश बोराटे यांनी प्रवीणला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीणने त्यांना देखील शिवीगाळ केली. शेवटी शिवीगाळ करणे, धमकावणे आणि सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण विरोधात गुन्हा दाखल केला.