पिंपरी : स्वत:चा अल्पवयीन मुलगा आणि भाच्याला मोबाईल फोन चोरी करायला लावणाऱ्याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. सुरेश दगडू जगताप (वय ३८, रा. कुसगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंध करणे आणि उघडकीस न आलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस वाकड आणि हिंजवडी भागात गस्त घालत होते. गस्त घालताना संशय आल्याने आरोपी सुरेश जगताप याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाईलबाबत तपास केला असता, स्वत:चा अल्पवयीन मुलगा आणि भाच्याकडून हिंजवडी भागातून चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली. त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.