पिंपरी : महिलेच्या प्रियकराचा खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पतीला अटक केली असून ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती. बेपत्ता असलेल्या प्रकरणाचा तपास करताना हा प्रकार समोर आला. किशोर प्रल्हाद पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> डीजेच्या लेझर बीममुळे पुण्यातील २३ वर्षीय तरुणाने ७० टक्के दृष्टी गमावली
किशोर पवार हा बेपत्ता असल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल होती. चौकशी दरम्यान पोलिसांना महिलेच्या पतीबाबत संशय आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. त्यावेळी बेपत्ता असलेल्या किशोरचा खून केल्याची कबुली त्याने दिली. पत्नीसोबत किशोरचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यातून त्याने किशोरला जीवे मारण्याचा कट रचला. २४ सप्टेंबर रोजी त्याने किशोरला दुचाकीवरून सूसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. तिथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबून सोबत आणलेल्या विळ्याने किशोरच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर किशोरचे हात-पाय बांधून मृतदेह मुळशी धरणाच्या पाण्यात टाकल्याचे पोलिसांना सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.