बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या पत्नीचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून निर्घून खून केल्याची घटना मंगळवारी सांयकाळी उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वी तरुणीचा विवाह बांधकाम व्यावसायिक तरुणासोबत झाला होता. दरम्यान पतीला सिंहगड पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.
पूजा स्वप्नील भडवळे (वय २२, रा. भैरवनाथ मंदिरामागे, गल्ली क्रमांक १४, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती स्वप्नील देवीदास भडवळे (वय २३) याला रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. अद्याप खुनामागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भडवळे कुटुंबीयांची शेती आहे. काही महिन्यांपासून स्वप्नीलने बांधकाम व्यवसाय सुरू केला होता. त्याने मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू केले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह पाषाण येथील सुतारवाडी भागात राहणाऱ्या पूजाशी झाला होता. पूजाने हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. मंगळवारी दुपारी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. कामानिमित्त त्याची आई बाहेर गेली होती, तर वडील परगावी गेले आहेत. मंगळवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास स्वप्नीलने सिंहगड पोलिसांशी संपक्र साधला. माझ्या पत्नीचा खून करण्यात आल आहे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन खोंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पूजाचा गळा तीक्ष्ण शस्त्राने चिरण्यात आला होता. तसेच तिच्या दोन्ही हातांवर वार करण्यात आले होते. पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने दिलेल्या जबाबात विसंगती आढळली. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. रात्री उशिरा पत्नीच्या खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.