लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : सावकारांच्या धमकीमुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राम परशुराम भोसले (वय ५१, रा. साईसृष्टी बिल्डींग, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत भोसले यांची पत्नी सुरेखा यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी, बलविंदर सिंग, नंदकुमार अडसूळ, शंकर पाटील, पाटील याची पत्नी, तसेच अजित इरकल यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पिंपरी : तुमचे नाव मतदार यादीत आहे का? नसेल तर नाव नोंदवण्यासाठी दोन दिवस संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम भोसले यांची आई आजारी होती. आईचे आजारपण आणि वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी सात वर्षांपूर्वी आरोपी राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाची परतफेड केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. त्यामुळे भोसले यांनी आरोपी अडसूळ याच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले. पाटील, त्याची पत्नी, इरकल यांनी त्यांना व्याजाने पैसे मिळवून देण्यास मदत केली होती. त्यांना भोसले यांनी ५० हजार रुपये दिले होते.

व्याजाने दिलेल्या पैशांची परतफेड करताना आरोपी त्रास देऊन धमकी देत असल्याने भोसले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बेकायदा सावकारी करणाऱ्या आरोपींच्या धमकीमुळे पतीने आत्महत्या केल्याचे भोसले यांच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man commits suicide due to threats from moneylenders pune print news rbk 25 mrj