आत्महत्या करत असल्याचा संदेश समाजमाध्यमात पाठवून एका तरुणाने खडकवासला धरणात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अनिकेत सुनील आल्हाट (वय २१ वर्ष, रा. नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत गुरुवारी (२५ मे) घरातून कोणाला काही न सांगता निघून गेला होता. मी आत्महत्या करत असून त्यास कुणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी त्याने मृत्यूपूर्वी लिहिली होती. चिठ्ठी त्याने एका मित्राला समाजमाध्यमावर पाठवली होती. त्याच्या मित्राने ही बाब त्याच्या नातेवाइकांना सांगितली.
हेही वाचा >>> पिंपरी: धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून अकाउंटंटकडून पावणे दोन कोटींची फसवणूक
अनिकेतचा मोबाइल संच बंद असल्याने त्याच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, खडकवासला धरणात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हवेली पोलिस ठाण्याचे पथक तेथे रवाना झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी त्याच्या खिशात मोबाइल संच आढळला. पोलिसांनी मोबाइलमधील सीमकार्ड काढले. दुसऱ्या मोबाइल संचात सीमकार्ड घालून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. अनिकेतच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी हवेली पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.