पत्नी आणि तिच्या घरातील मंडळी सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या त्रासाला कंटाळून पतीने रेल्वे खाली उडू मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीसह चौघांविरोधात विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश घोडके असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सतीश हे ३२ वर्षांचे होते. या प्रकरणामध्ये सतीश यांची पत्नी शुभांगी घोडके, विजय माली पाटील, जयश्री बाई माली पाटील आणि गणपतराव माली पाटील या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सतीश आणि शुभांगी यांच्या विवाहाला जवळपास सात वर्ष झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असायचे. त्यामध्ये पत्नी शुभांगी हिच्या घरातील मंडळी सतत हस्तक्षेप करायचे. सतीशच्या चारित्र्यावर पत्नी संशय घ्यायची. आपण गावी नको रहायला, पुण्यात राहू तिथे नोकरी करा, तुम्ही तुमच्या घरच्यांना पैसे द्यायचे नाही, असा आग्रह सतीश यांच्याकडे त्यांची पत्नी करायची. तिच्या घरच्याचेची हेच म्हणणे असायचे.
या सततच्या त्रासाला कंटाळून सतीश यांनी २७ फेब्रुवारी रोजी पुण्यामधून निघून, मुंबईमधील कुर्ला रेल्वे स्थानकात रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मयत सतीश यांचे वडील शिवलिंग घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी शुभांगी घोडके, विजय माली पाटील, जयश्री बाई माली पाटील आणि गणपतराव माली पाटील या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.