पुण्यात सेक्सटॉर्शनचे आणि सायबर फ्रॉडचे अनेक प्रकार घडलेले आहेत. तरिही पुण्यातील लोक सायबर चोरट्यांच्या नवनव्या क्लुप्त्यांना बळी पडत आहेत. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर दिसणाऱ्या जाहीरातांना भुलून अनेकजण लाखो रुपये गमावून बसत आहेत. आता पुण्यात अशीच एक ताजी घटना घडली आहे. पुण्यातल्या हिंजवडी येथील ४३ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी तब्बल १२ लाख २४ हजारांचा गंडा घातला. १४ आणि १५ जानेवारी रोजी व्हिडिओ लाईक करुन पैसे कमवा, अशा ऑफरला हा व्यक्ती बळी पडला. त्यानंतर फसवणुकीत बळी पडलेल्या रवी सोनकुशरे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन दाद मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विषय काय?

फसवणूक झालेल्या रवी सोनकुशरे यांच्या मोबाइवर एक लिंक आली. त्या लिंकवर क्लिक करुन रजिस्टर केले, तर एका लाइकला ५० रुपये मिळतील, अशी जाहीरत होती. या जाहीरातीला भुलून रवी यांनी पैसे कमविण्यासाठी लिंकवर रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संबंधित लिंकवर काही रक्कम भरुन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. सुरुवातीला रवी यांनी व्हिडिओला लाईक करुन १६ वेळा रिफंडच्या रुपात नऊ हजार रुपये कमावले. काहीही फारसे न करता चांगले पैसे मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर रवी यांना अधिक पैसे गुंतविण्यास सांगण्यात आले.

टेलिग्राम ग्रुप जॉईन करु नका

नव्या टास्कमध्ये अधिक पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगली रक्कम मिळेल, अशी भुलथाप सायबर चोरट्यांनी दिली. या आश्वासनाला बळी पडून रवी यांनी समोर दिलेला एक टेलिग्राम ग्रुप जॉईन केला. या टास्कमध्ये सोनकुशर यांनी तब्बल १२ लाख २३ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर आता चांगला रिफंड मिळणार या आनंदात असलेल्या रवी सोनकुशर यांना थोड्या वेळाने धक्काच बसला. रिफंड आणि बोनसबद्दल विचारताच सायबर चोरट्याने संबंधित टेलिग्राम ग्रुपच डिलीट करुन टाकला. त्यानंतर आपण फसवले गेले आहोत, याची जाणीव फिर्यादीला झाली.

हिंजवडी पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. अनोळखी व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस, सायबर सेल यांनी अनेकदा आवाहन करुनही काही लोक अशा गुन्ह्यांचे बळी पडत आहेत. त्यामुळे स्मार्टफोन, इंटरनेट वापरताना सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. हे या प्रसंगामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man falls for earn money by liking video trick loses rs 12 lakh rupees in pune kvg