लोकसत्ता वार्ताहर
लोणावळा: खंडाळा घाटातील मंकी हिल येथील एका खोल दरीत गुरुवारी रात्री पडलेल्या ओरिसातील एका युवकाला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात लोणावळा, खोपोली व मावळ तालुक्यातील आपत्कालीन पथकांना यश आले आहे. सुदैवाने हा युवक दरीतील एका झाडाच्या फांदीला अडकल्याने त्याचा जीव वाचला आहे. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय आला आहे.
हरिश्चंद्र (अज्जु) मंडल (वय २५, रा. ओडिसा, सध्या रा. गोवा) असे दरीत पाय घसरून पडून जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो गोव्यातील क्रॉम्प्टन कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र मंडल हा युवक गुरुवारी लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटन आणि गिर्यारोहणासाठी आला होता. गुरुवारी दुपारी लोणावळ्यातून एक रिक्षा भाड्याने करून तो लोणावळा, खंडाळा परिसरातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेला होता. सायंकाळी तो खंडाळा घाटातील मंकी पॉईंट परिसरात गेला होता. यावेळी त्याने रिक्षाचालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन ‘मी दूरध्वनी केल्यावर मला घेण्यासाठी या’, असं सांगितले. त्यानंतर रिक्षाचालक तेथून निघून गेला. त्यानंतर मंडल हा खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरात गेला. अंधार पडल्यानंतर माघारी फिरत असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान त्याचा एका दरीजवळ पाय घसरला आणि तो तेथील खोल दरीत पडला. सुदैवाने या दरीतील एका झाडाच्या फांदीला अडकल्याने दैव बलवत्तर म्हणून तो वाचला.
आणखी वाचा- पुणे: कोंढव्यातील ‘ती’ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन
दरीत कोसळल्यानंतर त्याने स्वतःला धैर्याने सावरत या घटनेबाबत घरी कळविले. त्यांनतर त्याने या घटनेची माहिती संबंधित रिक्षाचालकाला दिली व मदतीसाठी मागणी केली. रिक्षाचालकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी याबाबत लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या पथकाला कळविले. शिवदुर्गच्या पथकाने मावळातील वन्यजीव रक्षक संस्था आणि खोपोलीतील अपघाताग्रस्तांच्या मदतीची संस्था यांना मदतीसाठी निमंत्रित करत कोणताही विलंब न करता संबंधित आपत्कालीन पथकांनी घटनास्थळाचा दिशेने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी दाखल होताच लगेचच मदतकार्य सुरू केले. दोरीच्या साहाय्याने रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खाली उतरून त्या युवकाला मानसिक धीर दिला .त्याला सेफ्टी किट घालून रात्रीच्या गडद अंधारात प्रयत्नांची पराकष्टा करत सुरक्षितरित्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले. प्रथमोपचार करून त्याला लोणावळा शहर पोलिसांकडे सुपूर्द केले.