पिंपरी : विद्युत तारेला पाय लागून धक्का बसल्याने तोंडात ठेवलेले खिळे वीजतंत्रीच्या (इलेक्ट्रिशियन) फुफ्फुसात अडकले होते. फुफ्फुसात अडकलेले पाच आणि गिळलेले दोन, असे एकूण सात खिळे काढून रुग्णाला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले.
ॲल्युमिनियमचे पत्रे बसवत असताना, उघड्या विद्युत तारेला पाय लागून या १९-वर्षीय वीजतंत्रीला जोरदार धक्का (शॉक) बसला होता. त्यामुळे तो खाली पडला आणि काही काळ बेशुद्ध झाला होता. याच दरम्यान त्याच्या तोंडात धरलेले पाच खिळे त्याच्या फुफ्फुसात गेले आणि दोन त्याने गिळले. शुद्धीवर आल्यानंतर त्याला तीन मिनिटे तीव्र खोकला, छातीत वेदना आणि श्वास घेण्यास अडथळा जाणवू लागला. त्यामुळे तो उपचारांसाठी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल झाला.
डॉक्टरांनी तातडीने एक्स-रे काढल्यावर फुफ्फुसात पाच आणि पोटात दोन खिळे असल्याचे स्पष्ट झाले. खिळ्यांमुळे श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाली नव्हती. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बर्थवाल आणि त्यांच्या चमूने हे खिळे काढण्याचे नियोजन केले. कमी त्रासदायक असलेल्या ‘फ्लेक्सिबल एअरवे’ तंत्राचा वापर करून ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
तीन तास चाललेली प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक ठरली. ‘पाच खिळे डाव्या फुफ्फुसाच्या वरच्या भागातील श्वासनलिकेत अडकले होते. रॅट-टूथ आणि डॉर्मिया बास्केट फोर्सेप्स या उपकरणांच्या मदतीने खिळे यशस्वीपणे काढण्यात आले. प्रक्रियेदरम्यान एक खिळा ‘ओरोफॅरिंक्स’मध्ये सरकून रुग्णाने गिळला. मात्र, पुढील ४८ तासांत पोटातील दोन खिळे नैसर्गिकरीत्या बाहेर पडले,’ असे डॉ. एम. एस. बर्थवाल यांनी सांगितले.