पुणे : प्रेमप्रकरणाची माहिती प्रेयसीच्या कुटुंबीयांना दिल्याने मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीबरोबर असलेल्या दोन साथीदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. कोथरुड भागात ही घटना घडली होती. सुशांत रमेश ओंबळे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सुशांतने १० जुलै २०१८ रोजी मित्र अक्षय जोशी (वय २३, रा. काेथरुड) याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होती.

हेही वाचा >>> निवडणूक कामाच्या मानधनात तफावत?

सुशांत आणि अक्षय मित्र होते. अक्षयचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबधांची माहिती अक्षयने तरुणीच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर सुशांत त्याच्यावर चिडून होता. या कारणावरुन त्यांच्यात वादही झाला होता. सुशांतने दोन साथीदारांशी संगनमत केले. १० जुलै २०१८ रोजी त्यांनी अक्षयला कोथरुडमधील लोहिया आयटी पार्कमागील कलाग्राम सोसायटीच्या परिसरात बोलावले. अक्षय, सुशांत आणि दोन साथीदारांनी तेथे दारु प्यायली. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. बिअरची बाटली फोडून सुशांतने अक्षयच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी सुशांत आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात वैद्यकीय पुरावा, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए़. एन. मरे यांनी आरोपी ओंबाळे याला जन्मठेपेची शिक्षा आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.