पुणे : पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
रवींद्र ऊर्फ खन्ना रामू परदेशी (वय ४०, रा. वानवडी बाजार) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बबलू ऊर्फ हैदर परदेशी (वय २६, रा. वानवडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार अक्षय कांबळे याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सॅबस्टीन जॉन (वय ३१, रा. वानवडी) याने या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र परदेशी आणि आरोपी बबलू परदेशी आणि अक्षय कांबळे मित्र आहेत. तिघांची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. दोन महिन्यांपूर्वी तिघांमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून आरोपी परदेशी आणि कांबळे रवींद्रवर चिडून होते. सॅबस्टीन आणि रवींद्र वानवडी भागातील काटवन परिसरात दारू पित होते. त्या वेळी आरोपी अक्षय, बबलू आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन साथीदार तेथे आले. चौघा आरोपींनी रवींद्रवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या रवींद्रला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, पसार झालेल्या बबलू परदेशीला मध्यरात्री पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे तपास करत आहेत.