पुणे : सरस्वती आहे की नाही हा प्रश्न हल्ली उपस्थित केला जातो. पण, जग विश्वासावर चालते. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे, की जो स्वतः विश्वास ठेवतो आणि दुसऱ्यांना विश्वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतो ही आणि ती ठेवायलाही लावू शकतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केले.
प्रसाद प्रकाशनच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभात भागवत बोलत होते. सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रसाद प्रकाशनच्या संपादिका डॉ. उमा बोडस या वेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्रसाद प्रकाशनच्या संकेतस्थळाचे आणि इंटरनेट रेडिओचे उद्घाटन तसेच १३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
भागवत म्हणाले, आपल्याला सगळे जीवन सुखमय हवे असते. पण, सुख कशात आहे याविषयी दोन वेगळ्या विचारधारा आहेत. सगळ्या जगाची धारा एक आणि भारताची वेगळी आहे. याविषयी बरेच प्रयोग झाले. या विचारमंथनातून अनेक रत्ने निघाली तसेच हलाहलही निघाले. ते पचवून सहीसलामत बाहेर पडण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे. जगात ज्ञान-विज्ञान वाढले. पण त्यात असलेली उपनिषदांच्या रूपात पूर्णत्वाकडे नेते. आपण आपल्याला निसर्गाचा पुत्र मानतो. जेवढे तोडले त्याच्या दहापट लावायचे, हे आपल्या ऋषीमुनींनी वृक्षांबाबत शिकवले आहे. १० हजार वर्षे जंगलातून औषधी आणल्या. जमिनीतून अन्नधान्य काढले. मात्र, त्याला हवे ते खतरूपात परत दिले. अधिक पाहिजे ही हाव तेव्हा नव्हती. मात्र आता सगळेच बदलले आहे.
भारतीय संस्कृती अखंडपणे चालत असलेली संस्कृती आहे. जगात भारताएवढी एकही प्राचीन संस्कृती नाही. इजिप्तची संस्कृती सुरूवातीला इंग्रजांनी आणि नंतर यवनांनी संपवली, असे डॉ. देगलूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपल्यासारखी संस्कृती असलेल्या काही देशांतील नागरिकांना आपण स्वीकारले आहे परंतु रोहिंग्यांसारख्यांना आपण नाकारलेही आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अमेरिकेत लाखो विद्यार्थ्यांनी संस्कृत शिकायला सुरूवात केली. ते आपल्या संस्कृतीबद्दल भरभरून बोलतात. आपली संस्कृती देशात, राज्यात आणि इतर ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचे काम कोहिनूर हिऱ्यासारखे आहे, असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. देवभूमी असलेल्या आमच्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहिली. मात्र, आम्हाला हा सांस्कृतिक वारसा सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.